शेवटी तो दिवस आला. आठवड्यापासून हवामान चांगलं नव्हतं. मे महिना असुनही थंडी वाढली होती, त्यातच पाऊसही चालू होता. पॅरिसहुन संध्याकाळची TGV घेऊन रात्री मार्सेय (Marseilles) ला पोचलो. (६०० किमी = ३ तास ३० मी!!!) बरोबर आमच्या क्लबमधून घेतलेले स्कुबाचे जाकिट आणि हवेच्या टाकीला लावायच्या नळ्या होत्या. शिवाय शेवटच्या मिनिटाला केलेली खरेदी म्हणजे गोताखोरीचे हातमोजे, पायमोजे आणि पोहायचा शर्ट. तिथल्या पाण्याचं तापमान १५ अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने या गोष्टी लागायची शक्यता होती. रेल्वेत जाताना आम्हाला दिलेलं कोर्स मटेरिअल वाचण्यात वेळ छान गेला. गोताखोरी करतानाची खुणेची भाषा, लागणारी वेगवेगळी उपकरणं, पाळायचे नियम आणि घ्यायची काळजी यांची एकदा उजळणी झाली. माझं फ्रेंच देखील थोडं सुधारलं. राहून राहून सारखा विचार करत होतो की समुद्रात पाण्याखाली कसं वाटेल... पण जेवढा विचार करावा तेवढा मनावरचा ताण वाढतच होता. शेवटी काहीही विचार न करता जे समोर येईल त्याला तोंड द्यायचं ठरवलं. रात्री मार्सेय स्थानकावर बाकीचे लोक भेटले. तिथून क्लबला घेऊन जायला त्यांच्या मिनीबस आल्या होत्या. झोपायची सोय गोताखोरी क्लबमध्येच होती.
सकाळी उठून आवरून न्याहारी केली आणि सगळे खाली जमलो. पहिलं काम म्हणजे गोताखोरीचा सुट आणि वजनांचा पट्टा भाड्यानी घेणं. जाकिट आणि हवेच्या टाकीला लावायच्या नळ्या बरोबर होत्या. हवेची टाकी बोटीच्या धक्यावर मिळणार होती. माझ्या मापाचा सुट तर अजिबात सुटसुटीत नव्हता!
मी सुट चढवताना [१]
ते जाड कापडाचे (७ मिलीमीटर) एकावर एक घालायचे दोन सुट होते. दोन्ही 'वन पीस' होते आणि आतला फुल तर वरचा हाफ होता. वरच्या सुटला जोडलेली टोपीपण होती. हा सुट घालायचा म्हणजे एक कसरतच होती. पण १५ अंश सेल्सिअसच्या पाण्यात याची गरज होती. सुट सच्छिद्र (Porous) अशा कृत्रिम कापडाचा होता ज्यात हवेचे अतिशय छोटे बुडबुडे अडकवलेले असतात. शिवाय सुट आणि त्वचा यामध्ये अडकलेले पाणी देखील शरीराला गरम ठेवते. पण या जादा सुट मुळे आपली घनता कमी होते त्यामुळे पाण्यात बुडण्यासाठी वजनाचा पट्टा देखील घालावा लागतो. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे फक्त शरिराचे वजन आपल्याला बुडवायला पुरेसे नसते. गोताखोरीच्या सामानासकट देखील आपण कसेबसे बुडू शकतो. वर हा हलका सुट घातल्यामुळे बुडणे अजूनच अवघड होते. त्यामुळे मला सात किलोची वजनं लावलेला पट्टा कंबरेला लावावा लागला.
अशा प्रकारे पहिल्या वहिल्या (समुद्रातल्या) डुबकीसाठी आम्ही तयार झालो. क्लबच्या प्रांगणात आम्हाला डुबकीच्या जागेची माहिती दिली गेली. फळ्यावर डुबकीच्या ठिकाणाचा नकाशा काढून बोट कुठे नांगर टाकेल, तिथून कुठे जायचं, काय बघायचं हे सांगितलं गेलं. तसं आमच्या (लेवल-१ गोताखोर[३]) बरोबर प्रशिक्षक असण्याने दिशादर्शनाची जबाबदारी आमची नव्हती. इथून मिनिबसेस आम्हाला सगळ्यांना धक्यावर घेऊन गेल्या. इथे हवेच्या टाक्या घेतल्या. त्याला जाकिट, नळ्या जोडल्या. सगळं व्यवस्थित आहे का ते बघितलं आणि सर्व समान बोटीत ठेवलं.
क्लबच्या बोटी 'झोडीयाक' प्रकारच्या होत्या. मधोमध सगळ्यांच सामान स्टीलच्या फ्रेमला बांधायचं आणि कडेला फुगवलेल्या रबरावर आपण बसायचं. तशी बोट जास्त मोठ्ठी नसते. तरी एका बोटीत पंचवीसेक लोकं बसतात.
गोताखोरी किनाऱ्यावर करत नाहीत तर समुद्रात असलेल्या बेटांच्या इथे बोटीवर नेले जाते. हे ठिकाण धक्यापासून बरेच लांब असू शकते. एकदा बोटीने नांगर टाकला की सगळे एकाडएक तयार होतात आणि पाण्यात उतरतात. बोटीच्या प्रकारानुसार पाण्यात कसं उतरायचं ते ठरतं. झोडीयाक वरून आम्ही पाठीमागे अंग झोकून देऊन पाण्यात उतरत असू.
पाण्यात उतरल्या उतरल्या पहिली जाणीव झाली ती खारट चवीची. मी तर विसरलोच होतो की समुद्राचं पाणी खारट असतं ते! जलतरण तलावात एरवी सराव करताना तोंडात थोडं पाणी गेलं तरी काही बिघडत नाही. थोडं पाणी पोटात गेलं तरी नो प्रोब्लेम! पण इथे तोंडात गेलेलं खारट पाणी धड गिळताही येत नाही आणि बाहेरही काढता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एवढा जाड सुट घालून थंड पाण्यात डुबकी मारायची ही पहिलीच वेळ. सुट घातल्याने थंड पाण्याची जाणीव हाताचा पंजा, पाऊले आणि चेहरा इथेच झाली. या नवीन अनुभवांना सावरून आम्ही तिघं आमच्या प्रशिक्षकाबरोबर खाली जाण्यासाठी नांगराच्या दोरखंडाला पकडून तयार झालो. जाकिट आणि फुफूसातील हवा काढून देखील मी खाली गेलो नाही म्हणाल्यावर माझ्या प्रशिक्षकांनी मला नांगराच्या दोरखंडाला पकडून खाली यायला सांगितलं. पाणी जलतरण तलावाइतके स्वच्छ नसल्याने सुरवातीला काहीच दिसत नव्हते. थोड्या वेळानी डोळे सरावल्यावर तळ दिसायला लागला. वरती बघितलं तर 'Finding Nimo' मधे जशी खालून वरची बोट दिसते तशीच मलापण वर बोट दिसल्याने गंमत वाटली.
जसे जसे खाली जाऊ तसे कानातला आणि घशातला हवेचा दाब सारखा करावा लागतो. आम्ही सरळ खाली साधारण सात-आठ मीटर गेल्यावर दोरी सोडली आणि प्रशिक्षकाच्या मागे मागे जाऊ लागलो. दर दोन मिनिटांनी तो आमचे हाल हवाल विचारात होता. आता मनावरच दडपण कमी झालं होतं. आजूबाजूला मासे, प्रवाळ आणि इतर पाण वनस्पती दिसत होत्या.
इथे थोडं पाण्याखालच्या भूरचनेबद्दल सांगितलं पाहिजे. मला बरेच लोकं हा प्रश्न विचारतात की "समुद्राची सरासरी खोली किती असते?". तर समुद्र हा काही जलतरण तलावासारखा नाही. जशी भूरचना जमिनीवर असते तशीच पाण्याखाली देखील असते. डोंगर, पठार, कडा, दरी या गोष्टी समुद्राखाली देखील दिसून येतात. त्यामुळे सपाट तळावरून जाताना असे वाटायचे की आपण एखाद्या जंगलातून जातोय तर एखाद्या कड्यावरून पलीकडे जाताना वाटायचं की आपण उडतोय! एक-दोनदा त्या सरळ खाली जाणाऱ्या कड्याची मला भीती देखील वाटली. कधीकधी तळ इतका दूर असे की दिसायचा पण नाही म्हणजे पायाखाली जमीनही नाही, मी उडत पण नाहीये आणि खाली पडत पण नाहीये अशी काहीतरी विचित्र परिस्थिती. त्यामुळे ताळमेळ जुळायला थोडा वेळ लागायचा. खासकरून हे विचार जेंव्हा आजूबाजूला जास्त काही बघण्यासारखं नसेल तेंव्हा येतात. पहिल्या डुबकीत बघितलेली विशेष गोष्ट म्हणजे छोट्या दगडांच कुंपण असलेलं ऑक्टोपसच घर! शेवटी तीन मिनिटं तीन मीटर खोलीवर decompression साठी थांबून आम्ही वरती आलो. ही डुबकी चाळीस मिनिटांची झाली आणि माझ्या टाकीचा दाब २०० बार वरून ४० बार[२] वर आला. पहिलीच डुबकी असल्याने बरीच जास्त हवा मी घेतली होती. बोटीत चढताना जाणवलं की पायात त्राण राहिला नाहीये!
एक एक करत सगळे बोटीत परत आल्यावर आम्ही परत निघालो. सगळ्यांची परिस्थिती माझ्यासारखीच झाली होती. क्लबवर परतल्यावर अंघोळ करून जेऊन घेतलं. सणकून भूक लागली होती. थोडा वेळ आडवं पडल्यावर पुन्हा आवरायला सुरवात केली. कारण दीड वाजता दुपारच्या डुबकीसाठी निघायचं होतं. परत सकाळसारखंच आवरुन धक्यावर पोचलो. समुद्र सकाळसारखा शांत नव्हता. बंदर सोडून थोडे आत गेल्यावर समुद्राचे रूप बघून तर माझे धाबे दणाणले. एका हाताने समोरची फ्रेम आणि दुसऱ्या हाताने बोटीच्या कडेला असलेली दोरी घट्ट पकडली आणि चेहरा शक्य तितका सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. पहिल्यांदाच असा समुद्र पाहिलेल्या सगळ्यांची हीच गत झाली होती. लाटा जवळ जवळ नव्हत्याच... पाणी नुसते डचमळत होते. समुद्र एखाद्या जिवंत प्राण्यासारखा वाटत होता. पाण्याच्या टेकड्या तयार होत होत्या आणि त्या टेकड्यांवरून आमची बोट उड्या मारतच चालली होती. पण आमचे प्रशिक्षक एकदम निवांत होते! काहींनी तर कुठेही पकडले देखील नव्हते! मग मी पण हळूहळू एक हात सोडला.... सरळ बोटीच्या दिशेनी पाहू लागलो... मग लक्षात आलं की घट्ट पकडून ठेवल्याचा फायदा नाहीच झाला तर तोटाच होतो. झोडीयाक बोटीत बसायला फुगवलेल्या रबरी नळ्या असल्याने बोट जरी उड्या मारत गेली तरी आपल्या बुडाला ते धक्के बसत नाहीत. तरी दोन्ही हात सोडून बसणं काही जमलं नाहीच!
वरती समुद्र एवढा खवळलेला आहे तर खाली काय असेल, हा विचार मी सारखा मनातून बाहेर काढत होतो. माझं प्रशिक्षण आणि बरोबरचा प्रशिक्षक यांच्यावर विश्वास ठेऊन पाण्यात उतरलो. खाली गोष्टी जरा ठीक होत्या. पाण्याचे डचमळणं तळाशी कमी होत जातं. त्यामुळे प्रशिक्षकांनी सांगितलं होतं की पाण्याखाली दगडांच्या शक्य तितक्या जवळून जायचं. पाण्याचा प्रवाह पुढे-मागे होतो त्याबरोबर तळातले गवत देखील डोलत असतं. त्याकडे अगदी बघत राहावं असं वाटतं. यावेळी एके ठिकाणी दोन ऑक्टोपस आम्हाला बघून अजून खोल पळून जाताना दिसले. थोड्या वेळानी प्रवाहाची तीव्रता वाढल्यासारखी वाटली बहुतेक त्यामुळेच आमच्या प्रशिक्षकांनी परत फिरायचा इशारा केला. प्रवाहाची तीव्रता खरचं वाढली होती. त्यातच मला तळालगत राहता येईना. माझ्या प्रशिक्षकांनी मला पकडून खाली आणले आणि एका दगडाला धरायला सांगितले. तिथे समोरच कोपऱ्यात एक मोठ्ठा ऑक्टोपस होता. त्याला जायला कुठे जागाच नसल्याने आमच्याकडे (घाबरून किंवा चिडून) बघत होता. पण आम्हाला त्याला बघायला वेळ नव्हता. या गोंधळात आमच्या तिधांपैकी एक जण हरवला. प्रशिक्षकांनी इकडे तिकडे शोधले पण तो काही मिळाला नाही (नंतर कळलं तो दुसऱ्या गटाबरोबर पुढे गेला. जेंव्हा त्याच्या लक्षात आलं की हा चुकीचा गट आहे तेंव्हा त्याने आम्हाला शोधायचा प्रयत्न केला पण आम्ही त्याला सापडलो नाही आणि तोवर तो गटही पुढे गेला! शेवटी मग तो एकटाच हळू हळू वरती आला... हे देखील आधी प्रशिक्षण देताना सांगितलेलं असतं) आम्हीपण हळू हळू वरती आलो. बोटीपासून आम्ही बरेच दूर असल्याने पुन्हा बोटीपर्यंत पोहत जाणे आलेच. त्यातूनच तो थकवा, खवळलेला समुद्र यामुळे पाय मारणं पण कठीण झालं होतं. शेवटी काही मीटर प्रशिक्षकांनीच आम्हाला ओढलं. बोटीत कसेबसे चढलो. हात-पाय अगदी गळून गेले होते. आमचीच नाही तर सगळ्यांची हिच अवस्था होती. यावेळी कळलं की प्रशिक्षकांचं काम किती अवघड असतं ते!
संध्याकाळी परतल्यावर सगळे ताजेतवाने झाले. थोडे आजूबाजूला भटकून आले आणि मग सुरु झाली पार्टी!! प्रत्येकानी काहीतरी खायला आणि प्यायला आणलेले. सगळे मधे टेबलावर ठेऊन बाजूला अड्डा जमला. गप्पा चालल्या होत्या, खेचाखेची चालली होती. मला थोडं कळत होतं बरचसं फ्रेंच डोक्यावरून जात होतं. मग ज्यांना थोडं इंग्रजी येत होतं ते आवर्जुन माझ्याशी गप्पा मारून गेले. रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा अड्डा जमला. मी आपला रात्री दहाला जो झोपलो तो सरळ सकाळी सातला उठलो. ही लोकं रात्री एक-दोन वाजेपर्यंत पीत होती हे नंतर कळलं!
दुसऱ्या दिवशी सकाळची डुबकी मस्त झाली. शांत समुद्र, भरपूर सूर्यप्रकाश यामुळे भरपूर पाहता आलं. वर आल्यावर कळलं, आम्ही २७ मीटर खोलीपर्यंत गेलो होतो. ४५ मिनिटं लागली आणि अजूनही माझ्या टाकीत २०० पैकी ७० बार[२] हवा शिल्लक होती!!
या प्रवासातली शेवटची, रविवार दुपारची डुबकी त्यामानाने सगळ्यात खराब गेली. आधी सांगितल्याप्रमाणे, स्कुबाचा सुट सत्छिद्र असतो त्यामुळे आपली घनता कमी होते. पाण्यात बुडण्यासाठी कमरेला वाजनांचा पट्टा लावावा लागतो. बहुतेक माझ्या पट्यात एक किलो कमीच होते. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाजवळ असताना मी नेहमी वर ढकलला जायचो. जास्त खोल गेल्यावर बहुतेक वाढलेल्या दाबामुळे सुट आकुंचन पावत असावा आणि कमी झालेल्या आकारमानामुळे मी तेवढा वरती ढकलला जात नसेन. (Buoyancy force हा आकारमानावर अवलंबून असतो). तर, या शेवटच्या डुबकीत तळ जास्त खोल नव्हता. त्यामुळे मला खाली जायला सारखे पाय मारावे लागायचे. माझी बरीच उर्जा त्यात खर्च झाली. त्यातून वाढलेल्या प्रवाहामुळे एके ठिकाणी मी वरतीच येत गेलो. परत खाली जाणेही जमले नाही. अशाप्रकारे माझ्यामुळे केवळ २२ मिनिटात आम्हा तिघांची डुबकी संपली आणि आम्ही पोहत बोटीवर परतलो.
अशा चारही डुबकीचे अनुभव वेगवेगळे होते. त्यामुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. यानंतर पुन्हा दोन वेळा मी मार्सेयला गेलो. तिथे डुबकी मारण्याच्या जागा एवढ्या जास्त आहेत की नऊ वेळा डुबकी मारूनही एकाच जागी दोनदा डुबकी कधीच मारली नाही. आता मी नवशिका नव्हतो. या वेळी देखील वेगवेगळया परिस्थितीत डुबक्या मारल्या. पण आता एक आत्मविश्वास आला होता.
यावेळी खवळलेल्या समुद्रात बोटिवर मी हात सोडून बसू शकलो. थेट समोर समुद्राच्या डोळ्यात(!) डोळे घालून बघू शकलो. भीती ही फक्त आपल्या कल्पनेत असते, हे एकदा कळल्यावर भीती वाटेनाशी होते. पाण्याखाली देखील पाण्याच्या प्रवाहाला विरोध करायचा नाही हे कळुन चुकलं. उलट प्रवाहाबरोबर नाचत रहायचं... अगदी तळावरच्या पाण-गवतासारखं. तो प्रवाह आपल्याला कुठे घेऊन जाणारा नसतो... ट्रेड-मील सारखा एकाच ठिकाणी ठेऊन आपली उर्जा संपवणारा असतो. किती उर्जा खर्च करायची हे आपणंच ठरवायचं. त्यामुळे यावेळी जोराचा प्रवाह असूनही मी जास्त दमलो नाही.
पहिल्यांदा आम्हाला आमच्या क्लबनी नेले होते त्यामुळे डुबकी झाल्यावर आधी आमच्याकडून जाकिट (हवेच्या टाकीसकट) घेतले जाई मग आम्ही बोटीवर चढत असू. पण यावेळी मला बोटीवर येताना टाकीसकट यावे लागे. डुबकी झाल्यावर पाठीवरच्या टाकीसकट हलणाऱ्या बोटीच्या शिडीची एक एक पायरी चढताना सगळी शक्ती हातापायात एकवटून घ्यावी लागते. आता मला कळलं की आम्हाला जलतरण तलावात भरपूर पोहायला का लावायचे ते.
यावेळी इतर (आमच्या क्लबचे सोडून) लेवल-१[३] चे गोताखोर बघायला मिळाले आणि लगेचंच आमच्या क्लबच्या प्रशिक्षणाचे वेगळेपण लक्षात आले. त्यातले दोन मुख्य मुद्दे म्हणजे पाण्याखालचे संतुलन आणि सामानाची बांधाबांध. आमच्या प्रशिक्षणादरम्यान पाण्याखालच्या संतुलनावर विशेष लक्ष दिले गेले. त्यासाठी बराच सराव करवुन घेतला जाई, जसं, एकाच खोलीवर राहुन डोळ्यांवरचा गॉगल काढुन परत लावणे वै. याचा एक उद्देश असाही आहे की पायातले फिन्स तळाला टेकता काम नये. कित्तेक वर्ष वाढल्यावर फुटभर झालेलं प्रवाळ आपल्या फिन्सचा धक्का लागून एका क्षणात तुटू शकतं. माझा अनुभव म्हणजे माझ्या समोर जाणारा नवशिका गोताखोर एवढ्या जोरात पाय मारत होता की मागे धुळीचा लोट उठल्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे एक जादाचा माउथ-पीस डाव्या खांद्यावर गुंडाळून ठेवायला पाहिजे. त्याचा फायदा म्हणजे एकतर संकटकाळी लगेच हाती येतो आणि दगड-कपारीत अडकत नाही. माझ्याबरोबरच्या एका गोताखोराने तो असाच सोडला होता. त्यामुळे एकदा जेंव्हा तो माझ्या वरून जात होता तेंव्हा माझ्या सामानात त्याचा माउथ-पीस जवळ जवळ अडकलाच होता.
आता थंडी सुरु झाल्यावर जवळपास कुठेच डुबकी मारायला जाता येणार नाही. शिवाय लेवल-२[४] चा आभ्यास देखिल सुरु होइल. लेवल-२ गोताखोर प्रशिक्षकाशिवाय पाण्यात जाउ शकतो. अर्थात एकटा नाही पण दुसर्या लेवल-२ बरोबर. त्यासाठी अजुन बराच आभ्यास करायचाय.... मला वाटतं स्कुबामध्ये - किंवा बहुतेक सर्वच खेळांमध्ये - कधीतरी अशी वेळ येते की वाटतं आता बस्स झालं याहून अधिक नाही झेलू शकणार... एकदा हा टप्पा पार केला की खरी मजा सुरु होते. मग आपल्याला कळतं की ती मर्यादा फक्त मानसिक होती.... डरके आगे जीत है!... हे पटतं.
[१] फोटो बद्द्लः पहिल्या डुबकीच्या वेळी कॅमेरा नव्हता. दुसर्या वेळी एकटाच गेलेलो तेंव्हा disposable कॅमेरातुन काही फोटो काढले. तिसर्यांदा बायकोबरोबर असल्याने तिनी चांगले फोटो काढले. पाण्याखाली दाब वाढत असल्याने वेगळ्या प्रकारचे कॅमेरा कव्हर लागते जे बरेच महाग मिळते. गोताखोरी इथे सगळेच करतात त्यामुळे पाण्यावरचे फोटो काढायला कुणी इतके उत्सुक नसते.
[२] बारः हवेचा दाब 'बार' मधे मोजतात (जसं अंतर मीटरमधे मोजतात तसं). १ बार म्हणजे साधारण समुद्रसपाटीवर असणारा हवेचा दाब (१०० किलो पास्कल). जिथे आपण जन्मतो तिथल्या दाबाची आपल्याला सवय होते. त्यामुळे मराठी माणुस हिमालयात उंच ठिकाणी गेल्यावर altitude sickness होउ शकतो. थोडक्यात, जागेनुसार बदलत्या दबावाची साधारण आकडेवारी खालीलप्रमाणे... (स्त्रोत),
जागा.................., उंची (मीटर), दाब (बार)
----------------------------------------------------------
पाण्याखाली..........-२०...............३
पाण्याखाली..........-१०...............२
कोकण किनारा....००................१
लदाख..................६०००............०.५
म. एव्हरेस्ट.........८०००............०.३
[३] लेवल-१: इथे, फ्रांसमधे, FFESSM (Fédération Française d'Études et de Sports Sous-Marins) यांचा डायविंगचा परवाना घ्यावा लागतो. लेवल-१ च्या गोताखोराबरोबर प्रशिक्षक असणे बंधनकारक आहे. तसेच २० मीटरहुन जास्त खोल जाता येत नाही. स्वतःच्या टाकीतील हवेवर लक्ष ठेवणं, संकटकाळी काय करायचं याची माहिती असणं आणि प्रशिक्षकाला सोडुन न जाणं अपेक्षित आहे.
[४] लेवल-२: लेवल दोनचे (कमितकमी दोन) गोताखोर एकत्र ४० मीटरपर्यंत जाउ शकतात. प्रशिक्षकाची गरज नाही. म्हणजेच टाकीच्या दबावाबरोबरच दिशादर्शन, खोलीवर लक्ष ठेवणे, वर येण्याचा वेग नियंत्रित करणे, आप्त्कालिन परिस्थिला सामोरे जायची तयारी, सागरी वनस्पती-प्राणी-भुभाग यांची जाण अशा बर्याच गोष्टींची माहिती असणे अपेक्षित आहे.