गुरुवार, १३ मे, २०१०

4 Seasons...

आपल्याकडे पूर्वी सहा ऋतू असायचे (कोणते बरं...?!) हल्ली तीन असतात (हे कोणते ते सांगायची गरज नाही!). तसं इथे फ्रांसमध्ये चार ऋतू असतात. (आंतरराष्ट्रीय फॅशनवर नजर ठेऊन असलेल्यांना माहिती असेलच.. Spring/Summer.. Fall/Winter वै). तरी यांची फ्रेंच नावं अशी, printemps (म्हणजे spring, एप्रिल ते जुन), été (म्हणजे summer, जुलै ते सप्टेंबर), automne (म्हणजे fall, ऑक्टोबर ते डिसेंबर), hiver (म्हणजे winter, जानेवारी ते मार्च). म्हणजे मराठीत सांगायचं तर वसंत, उन्हाळा, पानगळ आणि हिवाळा. याचा अर्थ फक्त हिवाळ्याचे तीन महिनेच थंडी असते असे अजिबात नाही... उलट उन्हाळ्याचे तीन महिने सोडले तर बाकी नऊ महिने थंडीचेच!!! तसेच पावसाळा असा काही वेगळा ऋतू नाही कारण इथे वर्षभर पाऊस पडताच असतो.

उन्हाळा:
आम्ही या घरी राहायला आलो जुलैमध्ये... म्हणजे ऐन उन्हाळ्यात! या घराला मागे बाग होती त्यामुळे ऋतूतील बदल अगदी जवळून बघायला मिळाले. इथला उन्हाळा म्हणजे झाडांचा वाढीचा काळ. सगळीकडे हिरवीगार झाडी दिसते. फुलं नसतात तर नुसती पानंच पानं! इथेपण उन्हाळ्यात शाळांना सुट्या असतात... चांगले जुलै-ऑगस्ट असे दोन महिने. साधारण प्रत्येक फ्रेंच नोकरदार या दोन महिन्यात दोन/तीन आठवडे तरी सलग सुट्टीवर जातोच. कचेऱ्या ओस पडतात. एवढंच काय लहानसहान दुकानदार देखील आख्खा ऑगस्ट दुकानं बंद करून भटकायला जातात. असं म्हणतात की ऑगस्ट महिन्यात पॅरिसमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा पर्यटकांची संख्या जास्त असते! दिवसभर मस्त सूर्यप्रकाश असतो... चांगला रात्री दहा वाजेपर्यंत!!! तापमान २५ डी.से. पर्यंत सहज जाते.

तर खालचा फोटो घरी आल्या आल्या काढलेला, मागचे तीन महिने हे घर बंद असल्याने बागेत जरा जास्तच झाडी होती :-(



पानगळ:
थंडीची चाहूल लागताच झाडांची पानं गळायला सुरवात होते. मग ठिकठिकाणी वेगवेगळया रंगाची पानं (झाडावर आणि जमिनीवर) दिसायला लागतात. आता थंडी वाढायला सुरवात होते. दिवस छोटा होतो. एकंदर घराबाहेर फिरायचे दिवस संपत येतात. आता पुढचे सहा महिने तरी गप गुमान घरी हिटर लाऊन बसायचं. दिवसा सूर्य असला तरी त्याची उष्णता जाणवत नाही. इथे तसाही सूर्य आणि तापमान याचा थेट संबंध नसतो. तापमान समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यावर अवलंबून असतं.

आमच्या बागेचाही रंग बदलायला वेळ लागला नाही.



हिवाळा:
साधारण नाताळच्या आसपास बर्फ पडतो. पॅरिसमध्ये एक-दोन आठवडा बर्फ राहतो. पण यावेळी (२००९-२०१०) चांगला एक महिना होता. थंडी संपता संपत नव्हती. या क्षणी, मे मध्ये, देखील तापमान आठवडाभर पुन्हा १० डी.से. झाले आहे!! नाताळ निमित्त मॉल आणि विशेष नाताळ बाजार या जागा सोडल्या तर इतर ठिकाणी जास्त गर्दी नसते. खुद्द नाताळ देखील इथली लोकं घरीच साजरा करत असल्याने बाहेर रोषणाई सोडली तर सणासुदीच वातावरण नसतं. रोषणाई मात्र बघण्यासारखी असते. प्रत्येक लहान-मोठ्ठी नगरपालिका रस्त्यांवर इतकी सुंदर रोषणाई करते की ती पाहताना बोचरी थंडी सुद्धा जाणवत नाही. अंधार चार वाजताच पडत असल्याने आपण कचेरीत फार फार काम करतोय असं वाटतं!

पहिल्यांदाच बर्फ पडताना बघत असाल तर थंडी देखील जाणवत नाही! कधी कधी तर बर्फ इतका हळू हळू तरंगत येत असतो की स्लो मोशनमध्ये बघतोय असं वाटतं!! यावेळी स्वतःची बाग असल्याने बर्फात चक्क लोळून घेतले!!





वसंत:
हिवाळा थोडा कमी होत आला की एखाद्या आठवड्यात अचानक झाडांना फुलं येऊ लागतात.... पानं नाहीच थेट फुलं. अगदी ठरवल्याप्रमाणे आधी पिवळी फुलं, ती कमी व्हायला लागली की पांढरी मग त्यापाठोपाठ गुलाबी फुलं येतात. म्हणजे, एक के बाद एक... सबको मिलेगा स्टाईल!! ट्युलिप पण याच वेळी फुलतात. रस्त्याच्या बाजूनी मस्त फुलझाडं लावलेली असतात.

आमची बाग पण फुलून आली. विशेष म्हणजे इथला पहिलाच वसंत असल्याने आम्हाला दर तीन-चार दिवसांनी नवीन फुलं दिसायची. फुलांचे फोटो इथे पहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा