शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१०

सफर हॉलंडची

मागच्या वर्षी (इ.स. २००९) मे महिन्यात बऱ्याच सुट्या जोडून आल्या होत्या. महिन्याच्या सुरवातीच्या सुट्या जोडून आम्ही ऑस्ट्रियाला गेलो. महिन्याच्या शेवटीपण चार दिवस सलग सुट्टी मिळत होती. आत्ताच मोठ्या प्रवासावरून आलो असल्याने पुन्हा कुठे जायचं का नाही हे ठरत नव्हतं. मायबोलीवर हॉलंडच्या ट्युलिपच्या बागेचे फोटो पाहिले आणि आमची हॉलंड प्रवासाची तयारी सुरु झाली... ही सिलसिला फेम बाग वर्षातले दोन महिनेच चालू असते. या वर्षी २१ मेला बंद होणार होती. आम्ही अगदी शेवटच्याच दिवशी ती बघणार होतो. हॉलंडबद्दल मायबोलीवर माहिती काढतानाच एका मैत्रिणीनी चार दिवस घरी रहायचं आमंत्रणच केलं. हो-नाही करत करत शेवटी आम्हीपण ते स्वीकारलं. याआधी काही विशेष ओळख नव्हती पण तिच्या आग्रहाला नाही म्हणता येईना. एक दुसरा मायबोलीकर देखिल जर्मनीहून तिथे येणार होता. त्यामुळे युरोपातील मायाबोलीकारांचे एक छोटे गेट-टुगेदर ठरले.

अगदी शेवटच्या क्षणी प्रवास ठरल्याने बसशिवाय पर्याय नव्हता. युरो-लाईन बसची तिकिटे काढणार म्हणाल्यावर फ्रेंच सहकार्‍याचा चेहरा बघण्यासारखा झाला. त्यानी फक्त विचारलं, 'पहिल्यांदाच का?' आणि त्याला काय म्हणायचं होतं ते मी समजलो. प्रत्यक्ष अनुभवही फार वेगळा नव्हता. त्या स्थानकावर सरकते जिनेही नव्हते... नीट माहिती देणारे फलक नव्हते... रात्रभर त्या अरब चालक आणि त्याच्या मित्राच्या गप्पा ऐकाव्या लागल्या... या सगळ्यात झोपेचे बारा वाजले... पण काय करणार दुसरा काहीच (स्वस्त!) पर्याय नव्हता.

पॅरीस-अ‍ॅमस्टरडॅम बसने सहा तास लागतात. रात्री अकराला निघुन पहाटे आम्ही अ‍ॅमस्टरडॅम-अ‍ॅम्स्टेल स्टेशनला पोचलो. तिथुन आम्हाला जाईजुईच्या घरी उत्रेचला जायचं होतं. एवढ्या पहाटे तिथल्या स्थानाकावरची तिकीट खिडकी चालू झाली नव्हती आणि तिकीट यंत्राने आमचे विसा डेबिट कार्ड नाकारलं. शिवाय कधी नव्हे ते माझ्याकडे चिल्लरपण नव्हती. मग वाट बघण्याव्यातिरिक्त काही करणं शक्य नव्हतं. पहिलं दुकान उघडलं ते कॉफीच. पटकन तिथून कॉफी घेऊन चिल्लर मिळवली आणि यंत्रातून तिकिटे घेऊन युत्रेचला निघालो. ते थेट जाईजुईच्या घरी गेल्यावरच बरं वाटलं.

इथे येण्याआधी काय काय बघायचय याची चौकशी मित्रांकडे केली होती. मिळालेली माहिती म्हणजे, अ‍ॅम्सटरडॅमला जाताय तर मदुरडॅम, झॅन्से-शान, अ‍ॅन फ्रँक संग्रहालय, मादाम तुसार्ड्स संग्रहालय, डॉल्फिनेरीअम, रोटरडॅम (समुद्रकिनारा), हार्लेम इत्यादी बघता येइल. पण इथे पोचल्यावर हळू हळू कळलं की ह्या गोष्टी अ‍ॅम्सटरडॅममधे नसून हॉलंडमध्ये आहेत... आणि ही सगळी गावं एकमेकांपासून दोन-तीन तासाच्या अंतरांवर आहेत. हे कळल्यावर थोडा धक्काच बसला पण रेल्वे अतिशय सोयीस्कर असल्याने काही मनस्ताप झाला नाही.

पहिल्या दिवशी पोचल्या पोचल्या आवरून आम्ही ट्युलिप ची बाग बघायला बाहेर पडलो. या बागेचं नाव 'कुकेन्हॉफ'. युत्रेचहून लेडन सेंटर आणि तिथून बस घेऊन बाग. बस आणि बागेचं मिळून तिकीट स्थानकाबाहेरच मिळते. पहिलाच दिवस असल्याने आम्ही बाहेर बघण्यात मग्न होतो. बाहेर मस्त सूर्यप्रकाश होता. रस्त्याच्या बाजूनी हिरवळ, झाडं, फुलं सगळं एखाद्या युरोपिअन देशाला साजेसं होतं. पण इथली घरं थोडी वेगळी दिसत होती. लाकडाची घरं, दोन टप्यात उतरणारे छप्पर, आत्ताच घासून पुसून साफ केलाय असं वाटणाऱ्या काचेच्या खिडक्या सगळंच कसं अगदी नाजुक वाटतं होतं... एखाद्या पिक्चरच्या सेट सारखं!!

काही मिनिटातच आम्ही बागेत पोचलो. शेवटचा दिवस असूनही बरीच गर्दी होती. मोठ्या उत्सुकतेनी आम्ही आतमध्ये प्रवेश केला. अधीतर दिसेल त्या फुलाचा फोटो काढत होतो.



... पण हळू हळू लक्षात आलं की बरीच खळी मोकळी आहेत, तर बऱ्याच ठिकाणी फक्त झाडं होती... फुलं नाही :-( पुढे जाऊन बघितलं तर फुलांचे मळे राहिले नव्हते... माझ्या अंदाजे ३०% बागही शिल्लक नव्हती.. शेवटचा दिवस असल्याने आम्हीपण तयारीत होतो पण हे तर फारचं धक्कादायक होतं. तरीही बाग उघडी ठेवण्यात काय अर्थ होता माहित नाही.... मग जे होतं त्यात समाधान मानलं आणि लिलीचे प्रदर्शन वगैरे गोष्टी बघून आम्ही बाहेर पडलो.



आम्हाला वाटलं होतं बाग पूर्ण बघेपर्यंत संध्याकाळ होईल. पण लवकर बाहेर पडल्याने इकडे तिकडे थोडा टाईम-पास केला. हॉलंडच्या पर्यटन कार्यालयाला VVV नाव आहे. ते शोधण्याचा प्रयत्न केला पण कसल्याश्या सुट्टीमुळे ती कार्यालये आज बंद होती. आधीच मित्रांकडून कळलं होतं कि हॉलंड पास बराच स्वस्त पडतो. त्यात पाच तिकिटं मिळतात जी वेगवेगळ्या ठिकाणी आपण वापरू शकतो. तिथेच सगळा पैसा वसूल होतो, शिवाय बऱ्याच ठिकाणी खरेदीवर सूट मिळते. आम्ही आधीच ठरवल्या प्रमाणे हॉलंड पासची तिकिटं मादाम तुसाद संग्रहालय, कनाल बस, मादुरोदाम, झान्से-शान आणि डोल्फिनोरीअम इथे वापरणार होतो. अजून आम्हाला काही (पैसे देऊन) बघायचंही नव्हतं!! शेवटी थोडी टंगळ-मंगळ करून घरी परतलो.

कोणाच्या घरी राहण्यासारखं सुख नाही!! मागच्या ऑस्ट्रिया प्रवासात मावस भावाकडे उतरलो होतो आणि आता इथे! हॉटेलात राहत नव्हतो त्याचा अजून एक फायदा म्हणजे दिवसभराचे तेच ते विषय डोक्यात राहत नाहीत. संध्याकाळी घरी आल्यावर गप्पा-टप्पा झाल्यावर सगळा थकवा निघून जातो. आम्ही मस्त घरगुती जेवण करून ताणून दिली. काल रात्री बसमध्ये काही झोप मिळालीच नव्हती... ती आता वसूल केली. हातात दिवस भरपूर असल्याने सकाळी लवकर उठून पळापळ कारायचीपण गरज नव्हती.

दुसऱ्या दिवशी मादुरोदमला जायचं ठरलं. लेडन सेन्ट्रलच्या पुढचेच स्थानक. तिथे उतरल्यावर स्थानकावरच हॉलंड पास घेणार होतो. डेन हैग सेन्ट्रल स्थानकावर पोचलो आणि तिथेल्या पर्यटन कार्यालयात हॉलंड पास घ्यायचा होता... पण खुद्द स्थानकावर असं कुठलं कार्यालयच नव्हतं. मग तिथल्या रेल्वे मदत कक्षावरच्या कर्मचाऱ्याने सांगितले कि इथेच बाहेर पडल्यावर आहे VVV चं कार्यालय. इथून मादुरोदम ला ट्रामने जावं लागतं. तिचे तिकीट घ्यायला मोठ्ठी रांग होती, ती बघून आमचं असं ठरलं की मी तिकीट काढीन आणि बायको जाऊन दोन हॉलंड पास घेऊन येईल. मी हळू हळू पुढे सरकत ट्रामचे तिकीट काढले. अर्ध्या तास झाला तरी बायकोचा पत्ता नाही. एक तास झाला तरी ती नाही आली म्हणाल्यावर मी बाहेर जाऊन बघितले... मला जवळ कुठेच VVV चं कार्यालय दिसलं नाही.. मी ठरवलेली जागा सोडून लांब जाऊ शकत नव्हतो कारण चुकामुक झाली असती. मग तिथेच वाट बघत बसलो.. अजून अर्ध्या तासानी बायको परतली. इथेच कोपऱ्यावर आहे म्हणून सांगितलेलं कार्यालय बरंच दूर होतं. पर्यटकांची एवढी गैरसोय मी युरोपात दुसरीकडे कुठेही बघितली नाही. "प्यासा कुएके पास आता है|" ही म्हण डच लोकांनी फारच मनावर घेतली होती... आम्ही आपलं गुमान एक नंबर ट्राममध्ये बसलो.

हॉलंड पासचे पहिले तिकीट देऊन आम्ही मदुरोदम मध्ये प्रवेश केला. इथे हॉलंड मधल्या वेगवेगळ्या जागांच्या छोट्या आकारातील प्रतिकृती आहेत. जुन्या इमारती, शहरं, चर्च, बंदर, विमानतळ, जंगल.. सगळं अगदी हुबेहूब.









अशी जागा जास्त मोठ्ठी नाही... सगळं नजरेच्या टप्यात आहे... पण फिरून झाल्यावर वाटतं एखादं मोठ्ठ शहर बघून झालाय... आपणही तेवढेच दमलेलो असतो... मग तिथल्याच उपहारगृहात थोडं खाऊन आम्ही घरी परत यायला निघालो.

अजूनही रात्र झाली नव्हती त्यामुळे अ‍ॅम्सटरडॅमला जायचं ठरलं. मदुरोदम हून डेन-हैग सेन्ट्रल स्थानक ट्रामने आणि तिथून अ‍ॅम्सटरडॅम रेल्वेने... आम्ही तसं पहिल्यांदाच खुद्द अ‍ॅम्सटरडॅमला आलो होतो... रेल्वे स्थानक अगदी खाडीला लागुनच आहे. बाहेर पडल्यावर लगेच कनाल बस दिसतात. अगदी व्हेनिससारखे (आणि तेवढ्या संखेनी) नसले तरी अ‍ॅम्सटरडॅम मधेही कालवे आहेत हे मला माहित नव्हतं. तसे शहर छोटं नाही. मोठे रस्ते, मोठ्ठी वाहनं आहेतच. आम्ही हॉलंड पास मधील अजून एक तिकीट वापरून कनाल बस घेतली. या 'बस'चे तीन मार्ग आहेत. त्यातल्या एका मार्गाने ही बस पुढे निघाली. हवेत गारवा होता पण स्वच्छ सूर्य प्रकाश पडला असल्याने मस्त वाटत होतं.



बोटीत पर्यटन स्थळांची माहिती ऐकत हिटर शेजारी निवांत बसलो होतो. आजूबाजूने रस्ते, झाडी, जुन्या इमारती, उपहारगृह आणि त्याच्या बाहेर टेबल टाकून सूर्यप्रकाश 'खात' निवांत बसलेले गोरे, नव्या-जुन्या, छोट्या-मोठ्ठ्या होड्या हे सगळं मागं सरकत होतं.





सगळंच अतिशय सुंदर होतं. असाच एक मार्ग पूर्ण झाल्यावर आम्ही दुसऱ्या मार्गातील बोटीत बसलो आणि पुन्हा बाहेर बघू लागलो. हा मार्ग गावातून जाण्याआधी खाडीच्या पलीकडे जाऊन रेल्वे स्थानकाला वळसा घालून आला.



हि शेवटची फेरी असल्याने पुन्हा रेल्वे स्थानकाला न सोडता त्याने आम्हाला व्हान गोग संग्रहालया समोर सोडले. संग्रहालयात जायचे नव्हतेच, मग आम्ही गावातून पुन्हा रेल्वे स्थानकाकडे चालायला सुरुवात केली.

हॉलंड इथल्या सायकलींसाठी प्रसिद्ध आहे. इथे सायकली भरपूर संख्येनी दिसतात. खासकरून अ‍ॅम्सटरडॅम मध्ये. रेल्वे स्थानकाबाहेर दोन पातळ्या असलेले मोठ्ठाल्ले सायकल थांबे सर्रास दिसतात.



ह्या सायकली देखील चांगल्याच बळकट, आपल्याकडे पूर्वी असायच्या तशा. तसे इथले पुरुषतर सोडाच पण बायका देखील उंच आणि तगड्या, शिवाय डबल सीट जायचं असेल तर सायकल दणकट हवीच. रस्त्यावरून जाताना दिसते की एखादी बाई एका हाताने आरामात सायकल चालवते आणि दुसऱ्या हातात किराणा खरेदीच्या पिशव्या पकडल्या आहेत...आम्ही तर चाट. इथे अजूनही एवढे लोकं सायकल का वापरतात हे मला न सुटलेलं कोडं आहे!

संध्याकाळी परत घरी... अजून एक मायबोलीकर जो तेंव्हा जर्मनी मध्ये होता, तो देखील आला होता. आता आमचे गेट-टुगेदर अधिकृतरित्या सुरु झाले. (दोन पेक्षा जास्त मेंबरं गोळा झाली ना!!) ओळखी झाल्यावर अर्थातच मायबोलीचा विषय सुरु झाला.

दुसऱ्या दिवशी मादाम तुसाद संग्रहालय आणि नंतर झान्से शान च्या पवनचक्या बघायचं ठरलं. तसं लंडनचं मादाम तुसाद संग्रहालय प्रसिद्ध (आणि चिक्कार मोठ्ठ) आहे हे मी ऐकून होतो पण आख्खा युरोप झाल्यावर इंग्लंडचा विचार असल्यामुळे इथले संग्रहालय छोटे का असेना बघायचे ठरले. पुन्हा रेल्वे घेऊन अ‍ॅम्सटरडॅम... तिथुन चालत संग्रहालय. हॉलंड पास असल्यामुळे रांगेत न थांबता सरळ आत गेलो.

आतमध्ये थोडेफार साधे पुतळे झाल्यावर पुढे एक हॉरर शो होता, विषय होता, कॅरेबिअनचे चाचे! रस्ता चाच्यांच्या बराकीतून जाणारा होता. त्याच्या प्रवेशद्वारावर कमकुवत हृदय असलेल्यांसाठी (म्हणजे भित्र्या लोकांसाठी) धोक्याची सूचना होती... आतून वेगवेगळ्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. माझा काही प्रश्ण नव्हता पण बायको या बाबतीत कुंपणावर होती त्यामुळे तिने पर्यायी मार्ग घ्यावा का याबद्दल थोडे विचारमंथन झाले. शेवटी ती माझ्याबरोबरच आली. दरवाज्यातच एका खुन्खर (!) चाच्याने स्वागत केले. त्याचं कामच होतं की रांगेतली घाबरणारी (कुंपणावरची) लोकं हेरून त्यांचा कडेलोट करणं. त्यात माझी बायकोपण आली हे वेगळं सांगायला नको. त्या चाच्याचा सामना करून, न घाबरता (?) आम्ही आतमध्ये गेलो. आत अंधार (असायलाच पाहिजे), कसले कसले आवाज (हे पण मस्ट) आणि चित्र विचित्र माणसं (!). मधेच पायाखाली काहीतरी हलतं... मधेच जोरात हवा येते.... असं करत करत शेवटी एकदाचे आम्ही बाहेर आलो. त्या चाच्यांच्या लीला बघण्यापेक्षा बायकोला व्यवस्थित पल्याड घेऊन जाण्यावरच माझं सगळं लक्ष होतं!

बाहेर आल्यावर संग्रहालय सुरु झालं. मग हॉलंडची राणी, चर्चिल, राजकुमारी डायना, म. गांधी, द. लामा, मंडेला, मा. जाक्सन, बेकहाम, आईन्सटाइन, चा. चाप्लीन, जे. बाँड, मडोना, ब्रान्जेलीना, जू. रोबर्ट्स या नेहमीच्या पुतळ्यानबरोबर फोटो काढत काढत आम्ही पडलो. पुतळ्यांच्या जिवंतपणाबद्दल काही लिहायची गरजच नाही!!





शेवटी कुठल्याही संग्रहालयात शेवटी जे दालन असतं ते लागलं पण खिसा हलका न होता आम्ही बाहेर पडलो (आजचं मरण उद्यावर). इथुन मग चालत चालत रेल्वे स्थानकावर गेलो... वाटेत एक दुकान लागलं जिथे खास इथले लाकडाचे बूट होते...



आणि कालव्याच्या दोन्हीकडे अ‍ॅम्सटरडॅमचा ट्रेड-मार्क असलेल्या इमारती होत्या...



इथून मग पुन्हा रेल्वे घेऊन कुग-झान्दिक ला उतरलो. स्थानकावर उतरणारे आम्ही दोन-चार जणच होतो, आणि त्यातले पर्यटक फक्त आम्ही दोघेच. रस्ता ओलांडून पाट्या बघत बघत चालायला सुरुवात केली. गाव इतकं चिडीचूप होतं कि कुणी राहतं का नाही हे कळायला मार्ग नाही. दुपारची वेळ असल्यामुळे असेल बहुतेक. पुढे कळलं कि पुलाचं बांधकाम सुरु असल्याने फेरी बोटीने नदी ओलांडून पलीकडे जावं लागेल. झान्से-शान पलीकडेच वसलंय. तसं सर्व हॉलंड एका पातळीत आहे आणि सगळं छोट्या मोठ्या कालव्यांनी भरलाय. गुगल-नकाशा बघितला तर याची कल्पना येईल. 'नेदरलँडस्' या नावाचा उगमही यामुळेच झालाय.

१७ व्या शतकात, हॉलंडच्या सुवर्ण युगात याच कालव्यांनी महत्वाची भूमिका बजावली असणार. त्याचबरोबर हॉलंडच्या प्रगतीला कारणीभूत होत्या त्या पवनचक्या आम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळणार होत्या.





एक काळ असा होता की इथे हजारो पवनचक्या चालत. प्रत्येक चक्की वेगवेगळ्या कारणांसाठी वापरली जाई. औद्योगिक क्रांतीनंतर हळू हळू या पवनचक्या बंद पडल्या आणि मोडीत निघाल्या, त्यांची जागा वाफेच्या इंजिनांनी घेतली. इथे असलेल्या पवनचक्या ह्या त्या पूर्वीच्या पवनचक्याची हुबेहुबे नक्कल आहे. त्या वेळच्या आराखड्यांच्या मदतीने, त्या काळातील तंत्रज्ञान वापरून या पुन्हा तयार केल्या गेल्या. नदी किनारी आता पाच-सहाच पवनचक्या आहेत. प्रत्येकीचे काम वेगळे, एक तेल काढायला, एक रंगाची पावडर तयार करायला तर तीसरी लाकूड कापायला वापरली जाते.

आमचा हॉलंड पास इथेही कामी आला. रंगाची पावडर करायच्या पवनचक्की मध्ये खाली दोन भली मोठ्ठी दगडी चाकं होती. वरून पवनचक्कीच्या अक्षापासून कित्तेक सांधे-जोड वापरून वेग कमी करत (आणि टोर्क वाढवत) शक्ती खालच्या चाकांपर्यंत प्रक्षेपित केली होती आणि हे सगळं लाकडात केलं होतं. वारा एवढा होता कि पवनचक्की फिरेल पण जात्याला फिरवण्या इतका नव्हता त्यामुळे पवनचक्कीची गती फक्त मधल्या एक मोठ्या लाकडी खांबापरेन्तच येत होती. मग आम्ही शिड्या चढत चढत पवनचक्कीच्या एकदम वरती गेलो. लांबून छोटी दिसणारी पवनचक्की बरीच मोठ्ठी निघाली.





नंतर बघितली ती चक्की होती तेल काढायची. ही आधीच्या चक्कीहुन जास्त वेगळी नव्हती.



पुढची चक्की होती लाकूड कापायची. हि तर भन्नाटच होती. आतमध्ये ओंडके कापून त्याच्या फळ्या करायला दोन-तीन करवती होत्या. आपल्याला वाटतं तेवढं हे काही सोप्प नसतं... इथे एक पुली होती नदीतून ओंडका ओढून करवतीपर्यंत आणायला, तिथे आणल्यावर तो ओंडका जसा जसा कापला जाईल तसा तसा हळू हळू पुढे सरकवायला जायचा आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्याला उर्जा मिळायची ती म्हणजे पवनचक्कीच्या फक्त एका गोल फिरणाऱ्या अक्षापासून!!



... उगाचच नव्हतं आलं त्यांच्याकडे सुवर्णयुग. इथून पुढे इथल्या अजून खासियती म्हणजे परंपरागत पद्धतीनी तयार केलेलं चीझ आणि लाकडाचे बूट.





मग आम्ही मस्तपैकी पेटपूजा करुन परतीच्या प्रवासाला लागलो.

या रात्री अ‍ॅम्सटरडॅमच्या प्रसिद्ध 'लाल बत्ती' इलाक्यात जायचा बेत होता. ट्युलीप नंतर बहुतेक यासाठीच हॉलंड प्रसिद्ध आहे! ज्याला जगातला सगळ्यात जुना व्यवसाय म्हणतात तो इथे कायदेशीर आहे. त्यावर सरकार व्यवस्थित निगराणी ठेवते. एवढचं काय त्यावर आयकर देखील लागू आहे! आपल्याकडे कधी अशा इलाक्यातून जायची वेळ आलीच तर मान खाली घालूनच जावं लागतं, ती गोष्ट इथे नाही... हे देखील इथलं एक पर्यटन स्थळ असल्याने अगदी कापडाच्या बाजारपेठेतून जातोय असं समजून 'विंडो-शॉपिंग' करत जायचं! हा अनुभवही अगदी नेत्रदीपक होता, आता इथे सगळं कसं लिहू... कधी एकटे भेटा मग सांगेन. :-)

उद्या शेवटचा दिवस होता. बेत होता मत्स्यालय बघायचा. जमेल तेवढ्या लवकर उठून आम्ही डोल्फिनोरियम पहायला रेल्वे पकडून हार्डर्विक स्थानकाला आलो. तिथून बस घेऊन डोल्फिनोरियमला पोचेपर्यंत दुपारचा एक वाजला होता. इथे बरेच वेगवेगळे शो चालू असतात...

... आम्ही आधी सी-लायनचा शो बघितला,



.... मग छोट्या डॉल्फिनच्या करामती,



.... त्यानंतर वोलारास या अगडबंब प्राण्याचा शो आणि



... मग एक नाटक, समुद्री चांचे विरुद्ध एक पोलीस आणि त्याचा साथीदार मोठ्ठा सी-लायन, याचं



... सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्वाचा शो... तो म्हणजे डॉल्फिनचा!! काय झकास शो होता... मी वर्णन करूच शकणार नाही...



प्रत्यक्षच बघून घ्या... व्हिडिओ पहिला, दुसरा, तिसरा.

इथून मग बस-रेल्वे करत करत घरी परतलो. जायची तयारी केली. चार दिवस मस्त राहायला मिळालं होतं. आता पुन्हा एकदा युरो-लाईन चा रात्रीचा प्रवास (बापरे!) करून पॅरीसला घरी परत येणंच बाकी होतं.

1 टिप्पणी: