शनिवार, १ मे, २०१०

आमच्या अंगणातला वसंत

यावेळी हिवाळ्यानी वैताग आणला. आख्खा एक महिना बर्फ होतं. चार महिने तपमान १० च्या खालीच. त्यामुळे कधी एकदा उन्हाळा सुरु होतोय असं झालं होतं.
... आणि एक दिवस तो दिवस आला. चार महिने सगळ्या झाडांवर पानांशिवाय नुसत्याच काट्या-कुट्या दिसत होत्या. तिथे एका आठवड्यात ठरवल्याप्रमाणे अचानक पानं सोडाच थेट फुलंच यायला सुरुवात झाली.



आम्ही या घरी मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आलो होतो. तेंव्हा झाडांना पानं होती. पण तो फुलांचा काळ नसल्याने कुठल्या झाडांना कुठली फुलं येतात हे आम्हाला माहित नव्हतं. एप्रिल सुरु झाल्यापासून दर दोन-तीन दिवसांनी नवीन फुलं दिसू लागली. एक मोठ्ठं झाड होतं त्याच्या प्रत्येक फांदीवर भरपूर पिवळी फुलं आली.





दुसऱ्या झाडावर नाजूक पांढरी फुलं आली होती.





शिवाय अंगणात बऱ्याच ठिकाणी शोभेची तर काही रानटी फुलं आली.















एका कोपऱ्यात तर अचानक ट्युलिप आले! बहुतेक ट्युलिपचे कंद चुकून तिथं पडले होते.







बागेत गवताबरोबर एक रानटी वनस्पती पण दिसायची (अगदी डोकेदुखी, कितीही काढली तरी परत यायची.) तिला छोटी छोटी पिवळी फुलं आली.





या फुलांनी अख्खी बाग भरून गेल्यावर मस्त वाटलं. (दुरुस्ती: ही वनस्पती डोकेदुखी नाही!)



वसंत जसा जसा संपत आला तसं एक एक फुलं गायब झाली. त्याजागी झाड पानांनी बहरले. वरच्या पिवळ्या फुलांच्या जागी म्हातार्‍यांचे गुच्छ आले.





वाऱ्यावर या म्हाताऱ्या सगळीकडे पसरायला लागल्या... (आता कळलं की ही वनस्पती एवढी चिवट का आहे!)









... तर हा आमच्या अंगणातला वसंत!!

२ टिप्पण्या:

  1. म्हातार्‍यांचे उडते गुच्छ..अप्रतिम!
    फोटो साठी काय setting केला?
    मी एकदा रात्री काजव्यांच्या घोळक्यात सापडलो होतो त्याची आठवण झाली!

    उत्तर द्याहटवा