रविवार, १४ मार्च, २०१०

When in Rome... (इटली प्रवास: भाग २/२)

रोमहून सकाळी निघून दुपारी फ्लोरेन्सला आलो. लगेच हॉटेलात चेक-इन करून पिसाला निघालो.

पिसा
पिसा स्टेशनच्या बाहेरच कलत्या मनोऱ्याला जायला बस मिळते (बहुतेक १ नं. ची). इटलीत बसचे तिकीट बसमध्ये घेतलं तर महाग मिळतं. त्यापेक्षा वृत्तपत्र विक्रेत्याकडे किंवा 'टोब्याको' दुकानात विकत घ्यावं. ही बस मनोऱ्याच्या दाराशीच घेऊन जाते. मनोरा फोटोत बराच मोठ्ठा वाटतो पण प्रत्यक्ष पाहताना शेजारच्या चर्चसमोर अगदीच छोटा दिसतो. इथे गेलेल्या कुणीही आम्हाला 'मुद्दाम जायची गरज नाही' हेच सांगितलं होतं. पण ज्या गोष्टींबद्दल आपण लहानपणापासून ऐकत असतो त्या बघायची संधी मिळाली तर सोडवत नाही... हीच गत लिओनार्दोच्या 'मोनालिसा'ची!! त्यामुळे आम्ही अर्धा दिवस खर्च करून पिसा बघायचं ठरवलं. अगदीच काही अपेक्षा न ठेवता गेलं तर आवडेलही!

उन्हाळा असल्याने सूर्यास्त उशिरा व्हायचा. आम्ही पोचलो संध्याकाळी ६ ला... सूर्याच्या तिरप्या पिवळसर प्रकाशात मनोरा आणि आजूबाजूचा परिसर अप्रतिम दिसत होता. मनोऱ्यासमोरची हिरवळ जास्तच हिरवी वाटत होती



मनोऱ्यासमोरच्या हिरवळीवर सगळे पर्यटक मनोऱ्याला ढकलत किंवा टेकू देत होते. आम्हीपण आमचा हातभार लावला.



मनोऱ्याच्या वरतीही जाता येतं पण आम्ही गेलो नाही. इथे आल्यावरच मला कळलं की या मनोऱ्याचं कलणं हा अपघात आहे. मला वाटायचं तो मुद्दाम कललेला बांधला होता. वेळोवेळी केलेल्या डागडुजीनंतर सध्या तो ३.९९ डिग्री कललेला आहे. इथून गॅलिलिओने दोन वेगवेगळया वजनाचे गोळे टाकायचा प्रयोग केला होता असा समज आहे. प्रत्यक्षात तो एक वैचारिक प्रयोग (Thought Experiment) होता.
[ ते दोन वेगळ्या वजनाचे गोळे एकाच वेळी वरून सोडले तर बरोबरच जमिनीवर पडतात... सामान्यत: जड गोळा पहिल्यांदा जमिनीवर पडेल असं वाटतं. यावर अभियांत्रिकी वसतिगृहात आमची चर्चा झाली होती (बघा आमचे विषय काय असायचे!) आम्हीपण तो प्रयोग एक गोल कांगवा आणि लोखंडी कुलूप वापरुन केला... पलंगावर उभारून दोन्ही गोष्टी खाली टाकल्या... त्या एकाच वेळी खाली पडल्या तेंव्हा आमचं समाधान झालं. ]

एकतर सगळी गावं आणि स्मारकं दिवसा आणि रात्री बघायचीच हा माझा आग्रह असल्याने आम्हाला रात्र होईस्तोवर वेळ घालवणं आवश्यक होतं. शेजारचं चर्च बंद झालेलं. मग आम्ही आजूबाजूच्या गल्ल्यातून फिरत बसलो. एरवी वेळ घालवायचा असेल तर मी जेवण उरकून घेतो पण इथे मनाजोगं (मुख्यतः स्वस्त :-) ) उपाहारगृह सापडलं नाही. माझ्या मित्रांनी सांगितलेलं भारतीय उपाहारगृहपण जवळपास कुठे दिसलं नाही. संध्याकाळी चर्चसामोरील हिरवळीवर पाण्याची कारंजी सुरु झाली. हवेत उकाडा होताच... असं वाटत होतं मस्तपैकी हिरवळीवर पडून भिजावं! पण ते तर शक्य नव्हतं. मग ज्या ठिकाणी कारंज्यातील पाणी हिरवाळीबाहेर येत होतं तिथेच ते थोडं अंगावर घेऊन समाधान मानलं. तिथे आलेल्या दोन छोट्या मुलांनी मात्र ही संधी सोडली नाही... कारंज्यामागे पळापळ करताना घसरून पडत होते पण त्यांच्या आयांनी मानगुट पकडून नेल्याशिवाय त्यांनी पाय काढला नाही... (येवढा हेवा वाटला मला त्यांचा!)





प्रत्येक पर्यटन स्थळाला असणारी दुकान इथेही होतीच. त्यात थोडा वेळ गेला. शिवाय रस्त्यावर फेरीवाले देखील चिक्कार होते. सगळे आफ्रिकन आणि देसी (पाकिस्तान/बांगलादेश). अशी टंगळ मंगल करत करत शेवटी (पुरेशी) रात्र झाली... पण रोमसारखं इथेपण प्रकाशयोजना काही खास नव्हती.

. . . . . . . . . . . . . . . .



रात्रीच्या मनोऱ्याचे फोटो काढून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. रात्रीचे साडेआठ वाजले होते. पर्यटक पण बरेच कमी झाले होते. बाहेर येऊन बसची वाट बघत बसलो. बराच वेळ झाला बस आली नाही आणि थांब्यावर आम्ही दोघंच. वेळापत्रक बघितलं तर आठनंतर बसच नव्हती!! बसच्या रस्त्यांनी थोडं पुढे गेलो तर रस्ता सामसूम होऊ लागला. मग पुन्हा मागे जाऊन एका दुकानदाराला विचारलं तेंव्हा अजून एका बसबद्दल कळलं... २१ नंबर थोडी लांबून पिसा रेल्वे स्थानकावर जाणारी बस. ती बस आल्यावर हायसं वाटलं. मग रात्री पिसा रेल्वे स्थानकावर मॅक-डीत जेवण घेऊन परतीच्या गाडीत बसलो. आता उद्या फ्लोरेंस!!



फ्लोरेन्स
फ्लोरेन्स मला आवडलं. त्याचा इतिहास बराच थोर आहे. मला जास्त काही माहिती नाही पण कलेच्या क्षेत्रातले फार महात्याचे शहर होते. आम्ही नेहमीप्रमाणे पर्यटन कार्यालयात जाऊन सगळी माहिती घेतली. बसचा नकाशा घेतला आणि फिरायला निघालो. पहिल्यांदा गेलो गावाचे मुख्य चर्च बघायला. आजू बाजू भरपूर टपऱ्या आहेत ज्यात काहीही स्वस्त मिळत नाही. चर्चचं नाव बासिलिका दे सांता मारिया दे फिओरा... सांता मारिया म्हणाल्यावर पुन्हा Mind your language च्या जीओवानीची आठवण झाली... त्याच्या तोंडी पदोपदी हेच असायचं! चर्च बाहेरून बघण्यासारखे आहे. एकदम वेगळं स्थापत्य आहे. हिरवा दगड दुसरीकडे कुठे वापरलेला पहिला नाही. आतमध्ये जायला ड्रेस कोड आहे (व्हॅटिकन सारखं). आम्ही काय कधीही या ड्रेस कोड मधून पास होतो :-) !!



. . . . . . . . . . . . . . . .



यानंतर मायकलअन्जेलो निर्मित डेविड बघायला गालेरीआ दे'लाकाडेमिया (Galleria dell'Accademia) या संग्रहालयात गेलो तर तिथे ही मोठ्ठी रांग... या उकाड्यात रांगेत उभं राहणं शक्यच नव्हतं. त्यापेक्षा थोडे जास्त पैसे देऊन नंतरच्या वेळेचे तिकीट बुक केलं आणि आम्ही थोडी पेटपूजा करून परतलो. संग्रहालयात बऱ्याच वस्तू आहेत. एक भाग जुन्या संगीत उपकरणांचा आहे. पण मुख्य आकर्षण म्हणजे मायकलअन्जेलो चा डेविड. इथे पिसाच्या मनोऱ्याच्या (किंवा मोनालिसाच्या) उलट प्रतिक्रिया उमटते. आपल्या अपेक्षेपेक्षा पुतळा भव्य आहे. तोही एका अखंड संगमरवरातून केलाय. मागच्या साल्झबर्ग प्रवासात मायकलअन्जेलो वरची बीबीसीची डॉक्युमेंट्री बघितली होती. त्यानंतर इटली प्रवासात त्याच्या कलाकृती बघायला मजा येत होती. या डेविडलापण बघत राहावं असं वाटतं. पिळदार शरिराचा डेविड एकाग्र होउन 'गोलिएथ' बरोबर कसं लढायचं याचा विचार करत उभा आहे.

यानंतर गावातून फिरता फिरता आलो पिअझ्झा डेला सिग्नोरिया (Piazza della Signoria)ला. इथे पूर्वी डेविडचा पुतळा होता. आता या जागी त्याची नक्कल आहे. अजूनही बरेच पुतळे आजुबाजूला आहेत.

. . . . . . . . . . . . . . .



यानंतर फ्लोरेन्सचे सगळ्यात उल्लेखनीय स्मारक म्हणजे पोंते वेशिओ (Ponte Vecchio) बघितला. हा आर्नो नदीवरचा पूल वैशिष्टपूर्ण आहे. नुसता पूल नसून त्यावर सोनारांची दुकानंही आहेत.





इथून बस घेऊन आम्ही पिआझाले मायकलअन्जेलो (Piazzale Michelangelo) ला गेलो. हे ठिकाण शेजारच्या डोंगरावर असल्यामुळे इथून सगळं फ्लोरेन्स दिसतं. आम्ही गेलो तेंव्हा संध्याकाळ होत होती. त्यामुळे हलक्या लाल-निळ्या आकाशाखाली नुकत्याच सुरु झालेल्या मिणमिणत्या दिव्यांनी नटलेले फ्लोरेन्स सुंदर दिसत होतं. इथेही डेविडची ब्राँझमधली नक्कल आहे.

. . . . . . . . . . . . . . .





असे न ठरवता आम्ही योग्य जागी योग्य वेळी येत गेलो, त्यामुळे पिसा आणि फ्लोरेन्सचा प्रवास अनपेक्षितरीत्या चांगला झाला... आता उद्या सकाळी व्हेनिससाठी निघायचे होते.



व्हेनिस
दुपारी रेल्वेनी व्हेनिसला पोचलो. व्हेनिस हा बेटांचा समूह आहे. इथे यायला एकतर रेल्वे घ्यायची नाहीतर कारनी येऊन रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या थांब्यावर गाडी सोडून गावात बोटीने फिरायचे. इथेही आम्ही रेल्वे स्थानकाजवळचेच हॉटेल घेतले होते. पण इतर शहरांप्रमाणे सरळसोट रस्ते इथे नसल्याने हॉटेल शोधून काढणे जसा अवघड जाणार होते. रेल्वे स्थानाकावरच्या पर्यटन कार्यालयात जाऊन नकाशे आणि इतर माहिती घेतली. इथे फिरायला सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बोटी आहेत. आम्ही ७२ तास (२० युरो) चा पास घेतला. हॉटेलला कसे जायचे ते पण विचारून घेतले आणि बोटीत जाऊन बसलो. ग्रान्ड कॅनाल या मुख्य कालव्यातून आमची बोट पुढे चालली होती.



इच्छित थांब्याला उतरून नकाशा उलटा-पुलटा करून बघितलं तरी हॉटेल कुठे असेल त्याचा अंदाज येत नव्हता. इथे एकतर पाण्याचे कालवे आहेत नाहीतर छोट्या गल्ल्या. शिवाय विचारायचे कुणाला... सगळेच पर्यटक! शेवटी असेबसे एकदाचे ते हॉटेल सापडले. हॉटेल जुन्या इमारतीत होते. लाकडी आणि दगडी बांधकाम असलेल्या. खोली बऱ्यापैकी मोठ्ठी होती. तशीही बेटावरची हॉटेल छोटी आणि महाग असतात. बरेच पर्यटक प्रत्यक्ष बेटावर राहत नाहीत तर बाहेर राहून रेल्वे किंवा बसनी व्हेनिसला येतात.

या गल्लीत आमचे हॉटेल होते...

. . . . . . . . . . . . . . . . .

चेक-इन करून आम्ही फिरायला बाहेर पडलो. आजूबाजूला जुन्या इमारती, त्यामधून जाणाऱ्या छोट्या छोट्या गल्ल्या, मधेच लागणारा पूल, खाली कालव्यातून जाणाऱ्या गंडोला बोटी सगळं अगदी ऐकलं होतं तसंच!





या छोट्या गल्ल्या एखाद्या मोठ्या गल्लीला जाऊन मिळत. ती गल्ली पर्यटकांनी फुललेली असे. दोन्हीकडे बड्या बड्या फॅशन ब्रान्डस् ची दुकानं होती. मला काय त्यांची नावं माहित नव्हती (आणि उत्सुकताही नाही!) पण काही गोऱ्या मुली त्या दुकानांसमोर आपले फोटो काढत होत्या त्यावरून अंदाज येत होता. तशी ती दुकानं कमी आणि संग्रहालयच जास्त होती! लोकं नुसतीच आतमध्ये बघून यायची. आम्ही प्रत्येक चौकात नकाशा बघून आणि बरोबर गल्ली निवडून शेवटी व्हेनिसच्या मध्यवर्ती ठिकाणी 'पिआझा सान मार्को' ला पोचलो. इथे मध्ये मोठ्ठी जागा, तीन बाजूला इमारती, एका बाजूला चर्च आणि मोठ्ठी मिनार होती. आम्ही चर्च आणि मिनारीत गेलो नाही एकतर फार मोठ्ठी रांग होती आणि आता एवढी उत्सुकताही राहिली नव्हती.







हे त्याच जागेच रात्री काढलेले फोटो.





सान मार्कोला थोडा वेळ पाण्यात पाय घालून बसलो पण पाणी काही स्वच्छ नव्हते. मग इथून आम्ही लिडो बेटावर जाणारी बोट पकडली. मध्यवर्ती व्हेनिसवरची बेटं अगदी जवळ जवळ असल्याने पुलांनी जोडली आहेत. या समूहाव्यतिरिक्त अजून बरीच बेटं आजूबाजूला आहेत जिथे बोटीनीच जावं लागतं.



लिडो त्यातलंच एक. एका बाजुला व्हेनिस आणि दुसरीकडे भुमध्य समुद्रामध्ये हे चिंचोळे बेट पसरले आहे. इथे चक्क मोटारी आणि बसेस दिसल्या. बेटाची रुंदी जास्त नाही, त्यामुळे बोटीतून उतरून सरळ चालत पलीकडे गेलं की बीच लागतो. आम्ही संध्याकाळी पोचल्यामुळे सगळेजण परतत होते. (इथे काय सुर्यास्त बघत भेळ खायला लोकं समुद्रकिनारी येत नाहीत!!) कोकणाचा किनारा मला अतिशय प्रिय... इथे आल्यापासून समुद्रात जाताच आलं नव्हतं. एरवी पाणी भयानक थंड असायचं. त्यामुळे लिडो बीचला आल्यावर मी खुश होतो. या खुशीतच पाण्यात शिरलो... पण... इथेही पाणी स्वच्छ नव्हतं... माती, पाण-वनस्पती... थोडा वेळ चालून बाहेर आलो :-( ... आणि लोकं असल्या पाण्यात पोहत होते... कोकण किनाऱ्याची सर याला नाही. थोडं फिरून गुमान परतीची बोट पकडली. बोटीतून सूर्यास्त मस्त दिसला.



पुन्हा सान मार्कोला उतरल्यावर समोरच्या चर्चचा घेतलेला फोटो.



दुसऱ्या दिवशी व्हेनिस दर्शनाचा बेत होता. त्याप्रमाणे सकाळी उठून आजूबाजूची चर्च बघितली. मुख्य कालव्याचा पॉन्टे द'लाकाडेमिआ या पुलावरुन घेतलेलेआ हा फोटो...



पुन्हा त्याच गल्ल्या, तोच भुलभुलैय्या आणि तीच नकाशाशी झटापट करून आम्ही 'फेनीस' नावाच्या व्हेनिसच्या ओपेरा हाउस ला पोचलो. माझ्या फ्रेंच बॉसने याचं फार कौतुक केलं होतं म्हणून आतली टूर घेतली. एकदम सही निघालं. फेनीस म्हणजे फिनिक्स... हे सभागृह देखील दोनदा आगीच्या भक्षस्थानी पडून पुन्हा उभे राहिले आहे. नुकतेच याचं नुतनीकरण पूर्ण झालं आणि पूर्वी जसं होतं तसचं पुन्हा उभं केलंय. आतून अतिशय सुंदर दिसतं.

थोडं फिरल्यावर आम्ही बोटीनी व्हेनिसचे मुख्य आकर्षण 'रिआल्टो पूल' बघायला आलो.







पुलाच्या आसपास पुन्हा तिचं दुकानं होती. मग मुरानो वरील काचेचा कारखाना बघायला बोट पकडली. तिकडे उतरल्यावर समोरच एक जण उभा होता त्याने सगळ्यांना एका काचेचे समान बनवणाऱ्या कारखान्यात नेलं. पर्यटकांमध्ये जवळपास सगळे देसीच होते. युरोपात तसं देसी लोकात प्रसिद्ध म्हणजे पॅरिस, अ‍ॅमस्टरड्याम जवळील टुलिपच्या बागा, स्वित्झरलंड, रोम, व्हेनिस आणि इंस्ब्रुकचे स्वारोस्की संग्रहालय बास! एकाच ठिकाणी कोण कोण काय काय अपेक्षेनी येईल सांगता येत नाही. व्हेनिसला काही गोरे बीचवर पडायला यात, काहींना खाजगी संगीत मैफिलीत रस असतो तर देसी लोकांना बाकी व्हेनिसबरोब हे काच कारखाने बघायचे असतात. (तसचं अ‍ॅमस्टरड्याम गोऱ्यांच्यात नाईट लाइफ आणि मादक पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे तर आपल्यात ट्युलिपच्या बागांसाठी....)

तर, पूर्वी हे कारखाने मुख्य बेटावर होते पण कधीतरी व्हेनिसला आग लागली. त्यानंतर हे कारखाने बाहेर हलवले. इथे आम्हाला काचेच्या गरम गोळ्यापासून काचेचा घोडा आणि पाण्याचा जग तयार करून दाखवला. खरोखर फार कौशल्याचं काम आहे. आताच्या चायना मेड युगात हे कारखाने कसेबसे तग धरून आहेत. प्रात्यक्षिकानंतर कारखान्याच्या दुकानात थोडी खरेदी केली.
व्हिडीओ १, व्हिडीओ २.

. . . . . . . . . . . . . . .

आता आमचं व्हेनिस तसं बघून झालं होतं पण परतीचं विमान उद्या दुपारी असल्याने अजून एक दिवस इथे काढायचा होता. हा एक दिवस जाता जाईना... इकडे तिकडे फिरायचं म्हणल तर नकाशाबरोबर दोन हात करणं नकोसं झालं होतं... त्या चिंचोळ्या गल्ल्या अंगावर येत होत्या. गन्डोलातली सफर तर परवडण्यासारखी नव्हतीच. त्यातूनच उन काही कमी व्हायचं नाव घेत नव्हतं. त्यामुळे कधी इथे सावलीत बस कधी तिथे असं करत दिवस घालवला. रात्री एक भारतीय उपहारगृह शोधून मस्त जेवण केलं.

व्हेनिस शहरात तशी काही जान नाही. मुख्य गल्लीतून फिरताना पर्यटकांची हीss गर्दी... असं वाटत एखाद्या शॉपिंग मॉल मधून फिरतोय ज्याची थीम 'जुनं शहर' अशी आहे!! इकडच्या तिकडच्या गल्लीत शिरलं की याविरुद्ध, अगदी सुनसान... असं वाटत एखाद्या सिनेमाच्या सेटवर आहोत. इथे दिसतात आपल्यासारखेच नकाशा घेऊन वाट शोधणारे पर्यटक!!! मुख्य बेटावर बहुतेक जास्त रहिवासी राहत नाहीत (किंवा उन्हाळ्यात व्हेनिस सोडुन निघुन जातात). किराणा दुकान, शॉपिंग सेंटर, शाळा असं काही कुठे दिसलं नाही... सगळीकडे फक्त पर्यटक आणि त्यावर पोट असणारी दुकानं... म्हणजे हॉटेल, उपहारगृह, मोठ्या ब्रांडची दुकानं आणि सोव्हेनिअर शॉप्स.

त्यामुळे व्हेनिसला एक (जास्तीत जास्त दोन) दिवसांहून जास्त न राहिलेलंच चांगलं! पहिल्या दिवशी सुरु झालेला 'ट्रेजस हंट'चा खेळ दिवसागणिक 'प्रिसन एस्केप' मध्ये बदलत जातो! पण एकंदरित जेवढी हवा आहे तेवढं तरी नक्कीच आवडलं नाही. :-(

शेवटी, व्हेनिसचे प्रसिद्ध मुखवटे,



आणि कालवे व गंडोला,



परतीचा प्रवास इसी-जेटनी करायचा होता. आता स्वस्तातली विमान सेवा आम्हाला काय नवीन नव्हती. पण, यांचा काय नवीनच फंडा, चेक-इन केल्यावर सीट नंबर मिळत नाही. जास्त पैसे देऊन आधी आत जाता येतं... हव्या त्या जागी बसायला! आम्ही (अर्थातच) वरचे पैसे भरले नाहीत! मग बोर्डिंग गेटला, आपल्याकडे एसटीला जशी झुंबड लागते तशी लागली होती. आम्हाला नशिबाने शेजारच्या दोन जागा मिळाल्या आणि दहा दिवसाच्या या प्रवासाच्या आठवणी घेऊन आम्ही परत घरी निघालो.

1 टिप्पणी:

  1. very illustrative.. liked all the photos and description..

    graudually these posts are maturing into an encyclopaedic guide to Europe tour in Marathi :-)

    नंतर PDF बनवून ebook प्रकाशित कर मित्रा !

    उत्तर द्याहटवा