शुक्रवार, १२ मार्च, २०१०

पॅरिसमधले शेतकी प्रदर्शन...

आता तुम्ही म्हणाल लोकं पॅरिसमध्ये येऊन काय काय बघतात आणि मी हे काय दाखवतोय... पण हे दर वर्षी भरणारे शेतकी प्रदर्शन इथे बरेच प्रसिद्ध आहे. दर वर्षी होणाऱ्या जागतिक व्यापार प्रदर्शनानंतर याच प्रदर्शनाला सर्वात जास्त गर्दी होते. पॅरिसकरांना एरवी दिसणारे प्राणी म्हणजे पाळलेले कुत्रे-मांजरी आणि चालताना सारखी पायात येणारी कबुतरं (हो, इथे न उडणारी कबुतरं आहेत!!!). याशिवाय गाय-बैल, शेळी-मेंढी, कोंबडी-बदक हे फक्त खाटकाकडेच बघायला मिळतात! अर्थात जिवंत नाही... दुध-चीज ह्या गोष्टी दुकानदार स्वतः तयार करतो असा काहींचा प्रामाणिक समाज असण्याचीही दाट शक्यता आहे! तर आपण जे खातो पितो ते प्रत्यक्ष बघायची संधी कोण सोडणार!

तसा शेतकी व्यवसाय फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेत जास्त भर घालत नाही. GDP मधे याचा ३.८% हिस्सा आहे... हा झाला छापील मजकूर, मला ते GDP काळं का गोरं ठाऊक नाही. इथे फळं, भाज्या, धान्य आयात होतं. त्यामुळे कुठल्याही मोसमात काहीही मिळू शकतं! तरीही इथे शेतकी धोरणांना राजकीय महत्व आहे. फ्रांसच्या अध्यक्षांनी या शेतकी प्रदर्शनात येउन एखाद्या बैलाच्या पाठीवर थाप मारलीच पाहिजे असा संकेत आहे.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
(फोटो सौजन्यः बिबिसीच्या साईटवरुन)

पहिल्या दालनात सगळे पाळीव (आणि खायच्या किंवा प्यायच्या उपयोगाचे) प्राणी होते. यात वेगवेगळया जातीचे गाय-बैल, शेळी-मेंढी, कोंबडी-बदक आले. आत आल्या आल्या काय घमघमाट आला! स्वागत करायला हा याक होता, बिचारा एकटाच होता...



बाकीची गुरं अगदी एकटी नव्हती, हां त्यांना फिरता येत नसेल पण खाऊन-पिऊन आराम करत होती.





काही बछडेपण होते...



कित्तेक जुन्या फ्रेंच कंपन्यांची दालनं इथे होती. त्यात त्यांच्या कारखान्याची माहिती देण्यापासून गाईचे दुध काढायचं (अर्थात मशीनने) प्रत्यक्षिकपण होते.

एका ठिकाणी ओळीत गलेलठ्ठ बैल होते. सर्वात मोठ्ठा बैल १,६८० किलोचा होता. विश्वास बसत नाही न... कमीत कमी पाच फुट उंच, आठ फुट लांब आणि तीनेक फुट रुंद शरीराचा महाकाय बैल!





पुढे बऱ्याच प्रकारच्या मेंढ्या होत्या. त्या अनुषंगाने वेगवेगळया प्रकारच्या लोकारीदेखील पाहायला ठेवल्या होत्या.





इथेच मेंढ्यांचा फॅशन-शो देखील होत असे! अशाच एका शो साठी चाललेल्या या मेंढ्या...

. . . . . . . . . . . . . . . .

पुढे शेळ्या (का बकऱ्या? काय फरक?) आणि त्यांच्या दुधापासून बनवलेलं चीज होतं...



शेवटी कोंबडी आणि अंड्यातून नुकतीच बाहेर येणारी पिल्लं असा गर्दी खेचणारा देखावा होता!!!





हे दालन झालं की पुढच्या दालनात फळं, भाज्या, फुलं, धान्य त्याचबरोबर बागकाम साहित्य वै. यांचे प्रदर्शन होते.

. . . . . . . . . . . . . . . .

त्यात हिरवा फॅशन शो देखील होता (मग पॅरिस मध्ये प्रदर्शन आणि फॅशन शो नाही असं कसं शक्य आहे!!)



एकंदर लहान मुलांची चंगळ होती. एकतर कधीही न बघितलेले (पण रोज संबंध येतो) असे प्राणी होते त्यातून लहान मुलांसाठी वेगवेगळया स्पर्धा देखील होत्या. त्यातले प्रश्न म्हणजे, एखादा फळांचा रस पिऊन ते फळ ओळखायचं वै...



शिवाय यांत्रिक घोड्यावर बसणं (आणि पडणं):



आणि मासेमारीचा सराव अशा गोष्टी सुरु होत्या...

. . . . . . . . . . . . . . . .

पुढचे दालन होते पाळीव प्राणी पण ज्यांचा खाण्या-पिण्याशी संबंध येत नाही असे... यात आले कुत्रे, मांजरी, काकाकुआ वै पक्षी आणि घोडे.
एकीकडे कुत्रांचे प्रशिक्षण सुरु होते



तर मागे डॉग-शो चालू होता...



सर्वात शेवटी सगळ्यात भारी असा घोड्यांचा शो होता. त्या घोडे-मैदानाआधी दिसलेले हे काही घोडे...
हा हिप्पी घोडा...



आणि हा केसाची वेणी घातलेले...



हे काही शो चे फोटो...
या मैदानात घोडा, दोन घोड्यांची गाडी आणि चार घोड्यांची बग्गी चालवण्याची प्रात्यक्षिके (रिंगण घालणे, आठाचा आकडा करणे वै) चालू होती. त्या चार अश्वशाक्तीची गाडी एवढ्या वेगात वळायची की ती बाहेरच्या बाजूला उलटू नये म्हणून त्या बाग्गीमागे बसलेल्या तीन मुलींना आतल्या बाजूस शरीर झोकून देउन गाडीचा तोल सांभाळावा लागे.









एकंदर दिवस मजेत गेला!

. . . . . . . . . . . . . . . .

३ टिप्पण्या:

  1. Khup sundar... Fakt bhajyanche jara jast photo asate tar bar zal asat..

    Ekandar USA madhye jitakya bhajya miltat, tyachya duppat tari Paris madhye milat asnar (Nakkich)..

    Karan french ajunahi vegetables la human-consumable food mantar.. US madhye madhye, "cow eats vegetables" asa concept ahe!

    Vivek Jadye

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद विवेक,
    अमेरिकेत किती भाज्या खातात काही कल्पना नाही. पण इथे भारतापेक्षा कमी भाज्या मिळत असल्या (हवामानामुळे असेल) तरी जेवणात भाज्या असतातच.

    उत्तर द्याहटवा