पॅरिसमधे आल्यावर पहिलं काम म्हणजे घराचा शोध...
फ्रेंच बॉसनी आधिच कल्पना दिली होती की इथे घर शोधणं जरा अवघड काम आहे. त्यामुळे माझ्या कंपनीने मदत करायचं आश्वासन दिलं होतं, ते मी इथे येण्यावेळी (राजकीय पुढार्याप्रमाणे) मोडलं. मग काय सगळीच बोंब! मला फ्रेंच येत नाही, अर्ध्या एजंट्सना इंग्लिश येत नाही (हो.. फ्रान्समधे इंग्लिश यायची काही 'गरज' नाही). फ्रेंच बॉसनी बरीच मदत केली. Online Yellow Pages मधून एजंट्सचे (Agence Immobiliere) फोन नंबर काढुन दिले.
मग काय, फोन लावायचा आणि विचारायच 'पार्खले वू सांग्ले?' (Parle Vous Anglais?) म्हणजे, 'तुम्हाला इंग्लिश येतं का?', पलीकडून 'नो' आलं कि फोन ठेवायचा! इथेच अर्धे नंबर गळाले!! जे उरतील त्यांच्याकडे पुढची चौकाशी करायची....म्हणजे, किती खोल्या?, कितिपर्येंत भाड?, कधी मिळणार? कधी भेटायच? व.व.
असं करुन शेवटी थोड्याफार appointments ठरल्या. शिवाय दर शनिवारी जिथे जागा हवी होती तिथे भटकून अजुन एजंट्सना भेटायच. रविवार, सक्तिची सुट्टी... कारण इथे रविवारी हॉटेल, चित्रपटगॄह सोडुन सगळे बंद. (एका दॄष्टिने हे चांगलचं आहे, एक तरी दिवस पुर्ण स्वतःसाठी मिळतो!... या वाक्यातील 'गेहराइ' ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना कळणार नाही)
पुढची पायरी, प्रत्यक्ष जागा पाहाणे ही. इथे जागा बघताना विचारण्याच्या मुख्य गोष्टी म्हणजे खोली गरम करायची व्यवस्था (वय्यक्तीक/सोसायटीकडून, वीज/गॅस/गरम पाणी), स्वयंपाक कशावर करायचा (गॅस/इलेक्ट्रिक/सिर्यामिक) आणि गरम पाणी (वय्यक्तीक/सोसायटीकडून)?
त्या एका महिन्यात रात्री स्वप्नातपण मला नकाशेच दिसायचे... हा रस्ता ... तो रस्ता... २-खोल्यांच घर... ३-खोल्यांच घर... बापरे!
पण सगळ्या ठिकाणी जेंव्हा तो/ती एजंट माझी कागदपत्र पाहायचा तेंव्हाच सांगुन टाकायचे की, जागेचा मालक हो म्हणेल याची फार आशा नाही?... का, तर माझी परिस्थीती बघा,
- विसा: ३ महिन्यांचा (हो... फ्रांसमधे असच असतं... work permit दोन वर्षाचं मिळालं तरी विसा ३ महिने, आणि इथे आल्यावर 'रहवासी परवाना' (carte de sejour: Residence Permit) काढायचा, पण त्यासाठी राहायला जागा हवी! त्यामुळे माझ्याकडे तो नव्हता. आता ही गोष्ट 'बाहेरच्यां'साठी नेहमीची' असली तरी त्या एजंटला ते नविनच न.)
- Salary slip: नाही (इथे येउन २ आठवडे तर झाले होते! पहिला पगार कुठे झाला होता अजुन!)
- guarantor: नाही (भारतातुन मी एकटाच इकडे.. माझ्या आधीपण कोणी आले नव्हते.)
- offer letter: भारतीय पद्धतीचं
आता अशा माणसाबरोबर १ वर्षाचा करार कोण करणार?
एकदातर एक एजंटनी मला समोर बसवुन चांगलं अर्धा तास भाषण दिलं, फ्रेंच कंपनीतला पगार, त्यातील घटक आणि घर भाड्याने घेणे, यावर!!
पॅरिसमधे घर भाड्यानी घेण एवढ अवघड का आहे ते मला नंतर कळलं. इथे भाडेकरुला घराबाहेर काढणं महामुश्किल काम आहे म्हणे. असा कायदा आहे की थंडीच्या दिवसात 'कुठल्याही' कारणासाठी कोणाला घराबाहेर काढता येत नाही, अगदी भाडेकरु केस हरला तरीही न्यायालय देखिल त्याला (थंडीच्या दिवसात) बाहेर काढु शकत नाही. त्याचा परिणाम म्हणजे, घरमालक घर भाड्याने देतानाच भाडेकरुला पारखुन घेतो. पण त्यामुळे घर मिळायची मारामार...
पण यावरही इलाज आहे, ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांच्यासाठी सरकार गॅरंटॉर म्हणुन उभी राहाते!! मी त्याचाच वापर केला आणि शेवटी (एकदाचे) घर मिळाले, ते पण हवं होतं त्याच परिसरात!! पण यासाठी किती करामती कराव्या लागल्या ते मला, माझ्या मॅनेजरला आणि ('तो' असल्यास) देवाला माहीत... आता सगळच लिहू शकत नाही (मलाच लाज वाटते) तेंव्हा समजुन घ्या.
मग नेहमीप्रमाणे भाडे करारावर सही करताना छोट्यातली छोटी गोष्टपण लिहुन घ्यायची वगैरे सोपस्कार झाले. मी तर, टेबलावर असलेला डागही त्यात लिहिला, इथे परत फ्रेंच बॉसची बरीच मदत झाली. नशिबानी असं घर मिळालं की त्यात सगळ्या मोठ्या गोष्टी आधिच होत्या, म्हणजे टेबल-खुर्चि, पलंग-गादी, गॅस शेगडी इ. बाकी किरकोळ गोष्टी मग मी आणल्या.
रविवार, २९ मार्च, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
va mast.. mala ha blog mahit navta..
उत्तर द्याहटवाsahi ahe post!