शुक्रवार, २९ मे, २००९

मी पहिल्यांदाच - स्वतः पंग्चर काढलं ...

सायकल मला लहानपणापासुनच आवडते. आधी तीन चाकी, मग धडपडत शिकलेली दोन चाकी, मग दहावीमधे चांगले मार्क मिळाल्यामुळे घेतलेली माझ्या मनासारखी सायकल... इंजिनियरिंग होइपर्यंत त्या सायकलनी साथ दिली. त्यानंतर मात्र ती विकावी लागली :(. नोकरी लागल्यानंतर, लग्न झाल्यानंतर [जुनी सायकल विकल्यावर ५ वर्षांनी] पुन्हा एकदा सायकल घेतली. पण तिचं आणि माझं काय जमल नाही... काय ते तरंगलांबी (वेवलेंथ हो..) जुळली नाही म्हणतात ना, तसं झालं.

मग इथे, पॅरीसमधे, आलो. इथे ऑफिसला जायला आधी मी चालत मेट्रो स्टेशनला जायचो, तिथुन मेट्रोनी दोनच स्टेशन पुढे जाउन नंतर बसनी ऑफिसला. या रोजच्या प्रवासात चालणे आणि मेट्रो यात बराच वेळ जायचा. मग ठरवल सायकल घ्यायची.

पॅरिसमधे तशी सायकल हे काही दळणवळणाचे साधन नाही. इथे सायकल चालवणे हा खेळ म्हणुन प्रसिद्ध आहे. मला नाही वाटत 'टूर दी फ्रान्स' बद्दल काही सांगायची गरज आहे! माझ्या घराजवळ एक छोट जंगल आहे (woods ला मराठित काय म्हणणार? छोटं जंगलच ना? किंवा मोठी बाग म्हणा वाटलंतर) शनिवार-रविवारी बरेच लोक 'तयार' होउन रेसिंग ट्रॅकवर सायकल चालवायचा (खरतर पळवायचा) सराव करतात. त्यांच्यासाठी खास ट्रॅक आहे. या खेळाडूंशिवाय, सहकुटुंब सायकल चालवणारेही दिसतात. आई आणि/किंवा बाबा मोठ्या सायकलवर, छोटी मंडळी मागुन छोट्या सायकलवर, अगदीच छोटा आयटम असेल तर आई/बाबांच्या मागच्या सीटवर! सर्वजण हेलमेट वगैरे घालुन तयार!!

पण हे सगळ खेळापुरतच! रोज कोणी सायकल वापरताना दिसत नाही. हे पण बरोबरच आहे म्हणा, एकतर थंडी आणि वर्षभरात कधीही पडणारा पाउस यामुळे सायकल चालवण्याला पोषक वातावरण नाही. तश्या मोटार सायकल, स्कुटर (हो... चक्क व्हेस्पा) आणि मोपेड बर्‍याच आहेत. म्हणजे मला वाटलं होत त्याहुन जास्त प्रमाणात. पॅरिस शहरातील छोटे रस्ते व ट्राफिकमुळे कारपेक्षा हे दुचाकीस्वार लवकर पोचत असावेत.

खरतर मी मोटार-सायकलंच घेतली असती. पण म्हणलं सुरवात सायकलनी करु. एकतर सुटत चाललेच्या पोटाला थोडा व्यायाम होइल. अजुन एक जमेची बाजु म्हणजे रोजचे चालणे+मेट्रो या ऐवजी सायकलनी गेलो तर तीस-चाळीस मिनिटे वाचणार होती. माझे हे मनोदय कळल्यावर फ्रेंच बॉसनी मला सेकंड-हँड सायकल घेण्याचा सल्ला दिला. तो अंदाज मलाही आधी आला होताच. कारण इथे आसपास लावलेल्या सायकल पाहिल्या तर, सायकलच्या मानानी त्याला बांधलेली साखळी आणि कुलुपच हे भलं मोठ्ठ असतं. इतर दुचाकींचीपण तीच तर्‍हा, जसकाही त्या 'स्वंयंचलीत' दुचाकी स्वयं चालुन कुठेतरी जाणारच आहेत. पण कुलुप-साखळी लाउनही पुर्ण सायकल राहील याची शाश्वती नाही!



तशीही इथे नवीन सायकल घेण शक्यच नव्हत. सायकल ही गरज नसल्यामुळे दुकानात साधी सायकल नाहीच! सायकलींचे प्रकार म्हणजे, डोंगरी (Mountain bike), शर्यतीची (racing bike) आणि पुरातन (vintage bike). किमंत, १३० युरोपासुन सुरु!! आणि ही जर चोरिला गेली तर?!! त्यामुळे सेकंड-हँड शिवाय पर्याय नाही.

आता इथे सेकंड्-हँड सायकल घ्यायची म्हणजे ebay.com शिवाय पर्याय नाही. पण मला काही ते पटेना, सायकलला हातही न लावता ती विकत घ्यायची... आणि तिच माझं जमलं नाही म्हणजे!! मग बरीच शोधाशोध केल्यावर एक दुकान सापडलं.

मग काय, पुढच्याच शनिवारी दुकानात जाउन, चांगल्या २-३ सायकली चालवून बघुन, एक शर्यतीची (बारीक चाकांची) सायकल आणली... फक्त ५० युरो! ही गोष्ट ऑक्टोबरची, ऐन थंडीत मी नेहमीच मोठ्ठ जॅकेट न घालता, आतनं एक जास्त टी-शर्ट घालुन साध जॅकेट घातल्यावरच बायकोच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे... मी तर ठरवलंच होतं की सायकल बघायला गेल्यावर घेउनच परत यायचं!! दुकानापासुन घर १० कि.मी., त्या थंडीत मी बसच्या नकाशाच्या मदतीने दीड तास सायकल चालवून घर गाठलच!

लगेच बाकीची खरेदी पण झालीच... पुढचा छोटा दिवा, हवेचा छोटा(सा) पंप, रात्री चमकणारे सुरक्षा जॅकेट... सगळं कमीत कमी किमतीमधलं, तरी २० युरो झालेच!

तेंव्हा पासुन आत्तापर्यंत, पावसात-थंडीत-उन्हात मी रोज सायकल चालवतोय. (तसा पाउस इथे आपल्या सारखा धो-धो पडत नाही म्हणा.) मस्त वाटतं... आधी अगदी लक्ष देउन उजवीकडुन सायकल चालवावी लागायची, खासकरुन, डावीकडे वळताना सवयीप्रमाणे मी डाव्या रस्त्याच्या डाव्या बाजुला जायचो, पण आता सवय झालीये. मधे तर मला स्वप्न पडलं होतं की मी भारतात मोटारसायकल चालवतोय... तेही उजवीकडुन!! काय भयानक ना!!! ह्या सायकलचं आणि माझं चांगलं जमलय बर! फक्त दोनदाच सायकल घेउन जाता आलं नाहं, जेंव्हा बर्फ पडला होता त्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि सायकल पंग्चर झाली होती तेंव्हा... अरे हो लेखाच नावच ते आहे ना!!!

तर झालं असं की एका सकाळी रस्त्यात मला काही काचा दिसल्या, पुढचं चाक चुकवण्यात मी यशस्वी झालो पण मागच्या चाकाचा बळी गेला :(

आता इथे काय आपल्यासारखे कोपर्‍यावर सायकल रिपेअरची टपरी नाही. मला वाटलं, आता नवीन टायर, नवीन ट्युब... तरी म्हणलं बघाव तरी दुकानात, डीकॅथलॉन मधे एक आटोपशीर कीट मिळाला.



मग माझ्या आयुश्यात पहिल्यांदाच - लहानपणी पंग्चर काढताना पाहिलं होतं अगदी तश्याच पद्धतीने - मी स्वतः पंग्चर काढलं!



पद्धत तीच - लहानपणी बघितलेली, आणि मदतीला मॅनुअल होतचं. तर मी पंग्चर काढलं ते खालीलप्रमाणे,
१. सायकल आडवी केली.
२. एक काळा फोर्क वापरुन टायर रिममधुन काढलं, त्या फोर्कची दुसरी बाजु स्पोकला अडकवली. (नाहीतर टायर परत आत जात!)
३. दुसरा फोर्क वापरुन अजुन थोडं टायर काढलं, असंच पुढे करत गेलो आणि सगळ टायर निघालं.
४. ट्युब बाहेर काढली.
५. ट्युबमधे हवा भरली.
६. बादलीत पाणी घेउन पंग्चर नक्की कुठे आहे ते बघितलं.
७. ट्युबमधली हवा काढुन टाकली, ट्युब पुसुन कोरडी केली.
८. पंग्चरची जागा सँड पेपर वापरुन थोडी खडबडीत केली.
९. त्या जागेवर डिंक लाउन त्यावर पॅच लावला, थोडा वेळ दाब दिला, पाच मिनीटं तसंच ठेवलं.
-- इथे एक गडबड केली, तो पॅच चुकुन उलटा लावला, मग परत काढुन सरळ केला :)
१०. परत हवा भरुन पंग्चरची जागा चेक केली. सगळं व्यवस्थित असेल तर हवा काढली.
११. जिथे पंग्चर झालं होतं तिथलं टायर चेक केलं (एक काचेचा बारिक तुकडा सापडला)
-- हे महत्वाचं, नाहीतर सगळ होउन ट्युब आत टाकली की पुन्हा हवा जाणार!)
१२. ट्युब आत टाकली, टायर रीमवर चढवलं, हवा भरली...
... आणि सायकल तयार!

पॅरीसमधे पण सायकलीचा उपयोग वाढत आहे. काही वर्षांपासुन वेलिब नावाची सायकल भाड्यानी देण्याची सेवा इथे सुरु करण्यात आली. या सेवेअंतर्गत तुम्ही दिवसाचा/महिन्याचा/वर्षाचा पास घ्यायचा. (दिवसाचा पास १ युरो). या सायकली जागोजागी पार्क (लॉक) केलेल्या असतात. त्या मशिनला पास 'दाखवला' की तुम्ही सायकल घेउ शकता, पहिली ३० मिनिटे फुकट, मग प्रत्येक तासाला १ वा २ युरो चार्ज. या जागादेखिल बर्‍याच आहेत, अगदी प्रत्येक १००-२०० मीटरला! खासकरुन उन्हाळ्यात बरेच (पर्यटक) याचा लाभ घेतात. जर व्यवस्थीत नियोजन केले तर १ युरोत संपुर्ण दिवसभर सायकल चालवू शकता (दर आर्ध्या तासाच्या आत सध्याची सायकल परत करुन नवीन सायकल घ्यायची!!)

पण येवढी सायकल चालवुनही पोट सुटायचं ते सुटतच आहे... अगदी सिक्सपॅक पैकी दोन पॅक झालेत (ढेरीला दोन घड्या पडतात!!) आता चार राहिले :D
थोडक्यात काय तर या सायकलवर मी जाम खुष आहे त्यामुळे मुठभर मांस चढलय... अजुन काही नाही!!!