बुधवार, २९ जुलै, २००९

Bon Appétit ... भाग १

Bon Appétit (बोन् अपेति) असं जेवण सुरु करताना एकमेकांना 'विश्' करण ही फ्रांसमधली प्रथा... जसं आपण (कोणे एके काळी) 'वदनिकवल...' म्हणायचो किंवा (सध्या) 'करा सुरु'/'सावकाश होउद्या' म्हणातो तसं!!

फ्रेंच लोकांना जेवण अतिशय प्रिय... दोन वेळेला मस्त जेवण हवं या लोकांना. ऑफिसमधेपण तास-तास घेतात दुपारच्या जेवणाला. तशी यांची जमिनही खर्‍या अर्थाने सुजलाम्-सुफलाम्! त्यामुळे कशाचा तोटा नाही. शिवाय हल्ली सगळं आफ्रिका/लॅटिन अमेरिकेतुन आयातच होत. त्यामुळे कुठल्याही महिन्यात काहीही मिळतं. पॅरीसला आल्यावर मलाही बरेच खाद्यपदार्थ चाखायची संधी मिळाली. पण याबाबतीत माझा काही 'आभ्यास' नाही... मला जे काही वाटलं ते लिहितोय.

भारतात भारतीय खाद्यपदार्थ एवढे आहेत की अंतरराष्ट्रीय पदार्थ खाण्याचा कधी योगच आला नाही... किंवा गरज वाटली नाही. मराठी, कोकणी, गुजराथी, राजस्थानी, पंजाबी, बंगाली, दक्षिण भारतीय केवढी विविधता... केवढी चंगळ!! शिवाय भारतीय चायनिस फूड, भारतीय पिझ्झा, भारतीय बर्गर आहेच!!

तर सुरुवात करु भारतीय पदार्थांपासुन! [मेरा भारत महान]
आता पॅरिसमधे येउनही भारतीयच खायचा माझा आग्रह नाही. (हो, काही जणांचा असतो!) पण कधी कधी वाटतं खावसं, अशावेळी पॅरिसमधील भारतीय म्हणल्या जाणार्‍या भागात (ला शापेल / गार-दु-नोर्द) तर जाउच नये. तो खरतर सगळा 'दक्षिण' भारतीय भाग आहे. (जेवायच्या बाबतीत असा भेदभाव चालतो... एरवी 'सारे भारतीय माझे बांधव आहेत'!) सगळी दुकानं आणि हॉटेल तमिळ/श्रीलंकन लोकांची आहेत. बाहेर शहीद वाघांचे फोटो असणारी! तिथे पंजाबी डिशलापण सांबारची चव येते. हां... इडली-वडा-डोसा-उत्तप्पा खायचा असेल जरुर जा... (तरी पण आपल्या 'कामत'ची सर नाही!)

या 'भारतीय' भागाव्यतिरिक्त पॅरिसमधे इतर ठिकाणी असलेली 'इंडियन' हॉटेल्स ही बहुदा पाकिस्तानी वा बांग्लादेशींची आहेत... (इथे 'इंडियन' हे व्यापक अर्थानी). पंजाबी डिशेस तिकडे मिळतात. पण इथेही जास्त अपेक्षा ठेवायच्या नाहीत... दहात दोन चांगली निघतात. 'चांगलं' याचा निकश म्हणजे फक्त चवीला खरोखर भारतीय एवढाच! फ्रेंच लोकांना टोप्या घालतात इथली हॉटेल मंडळी. हे फ्रेंच पण येडे... रायत्याबरोबर नान खातात! मग जास्त परिश्रम कशाला घेतील हॉटेलवाले?! ते पण मग कोबी आणि गाजर घातलेले 'समोसे' करतात. :राग:

खाण्याबरोबरच इथे पिण्यालापण महत्व आहे. ;) "तुमच्याकडे जेवताना काय पिता?" यावर "पाणी" हे उत्तर माझ्या सहकारर्‍यांना झेपत नाही! इथल्या भारतीय हॉटेलात जेवणाबरोबर लस्सी असते! आपले अजुन एक प्रसिद्ध पेय म्हणजे 'चहा'. इथे चहा पेक्षा कॉफी प्रसिद्ध. चहा 'ब्रिटिशर्स्' पितात. चहाची कृती सांगितल्यावर तर त्यांना आपली फारच कीव येते. इथेली कॉफी म्हणजे पाणी आणि कॉफी बासं... एकदम स्ट्राँग!

बास झालं ना आपल्याबद्दल, आता जरा'फ्रेंच फुड' बद्दल:
फ्रेंच जेवण म्हणल्यावर सगळ्यांना आठवत ते फ्रेंच फ्राइज् आणि चीझ! त्यामुळे सुरवातीलाच सांगतो फ्राइज् हे फ्रेंच नाहीत... जास्त माहितीसाठी विकी वाचा. त्याबरोबरच हेही सांगावसं वाटतय की पिझ्झा, बर्गर हे पण फ्रेंच नाहीत (हो काही लोकांना मुद्दाम सांगाव लागत :) ).

चीज मात्र फ्रेंच आहे! इथे सॅन्डविचमधे, मेन डिशमधे, डेसर्ट म्हणुन सगळीकडे चीजचा वापरतात. फक्त फ्रांसमधे त्याचे साधारण ४०० प्रकार मिळतात!! आल्प्समधे 'फॉन्डु' नावाची चीज वापरुन केलेली डिश प्रसिद्ध आहे. टेबलावर छोट्याश्या विस्तवावर एका भांड्यात वितळलेले चीज आणि त्यात आपल्या आवडी प्रमाणे मसाले किंवा मशरुम किंवा बीफ वगैरे उकळत असते. आपण ब्रेडचे तुकडे त्यात बुडवुन खायचे. ज्यांना चीज आवडत नाही त्यांनी विचारही करु नये. पण इतरांनी एकदातरी जरुर चव घ्यावी.



तसेच इथले ब्रेडपण प्रसिद्ध आहेत... बगेत (Baguette), क्रोय्साँ (Croissant) वगैरे. बगेत म्हणजे बाहेरुन कडक आतुन मउ असा लांबलचक ब्रेड... संध्याकाळी बरेच जण बेकरीतुन रात्रीच्या जेवणासाठी ताजा बगेत घेउन जाताना दिसतात. माझे काही (भारतीय) मित्र तर बाहेरचा कडक भाग सोडुन फक्त आतला ब्रेड खातात (आपण पण ना कधी कधी 'अती' करतो :-( ) अजुन बर्‍याच प्रकारचे ब्रेड मिळतात. पण त्यात नवल नाही... जसे आपल्याकसे-महाराष्ट्रात- 'इंडियन ब्रेड'चे बर्‍याच प्रकारात मिळतो (पोळी, भाकरी (तांदळाची, ज्वारीची, बाजरीची), थालपिट, धिरडं, पुरणपोळी, गुळाची पोळी वगैरे) तसंच!! तरीही 'पावभाजी'चे पाव आम्हाला काही अजुन मिळाले नाहीत! (ते बहुधा ब्रिटिश ब्रेड असतील!)

फ्रेंच जेवणात मला भेडसावणारी पहिली समस्या म्हणजे शाकाहारी डिश नसणे! (अनुभवावरुन सांगतोय) जेवणात भाज्या असतात, नाही असं नाही, पण त्या साइड डिश... 'जेवण काय आहे?' या प्रश्णाला 'त्या भाज्या' हे उत्तर नाही! पण तेही एकवेळ ठिक. मी काही कट्टर शाकाहारी नाही. अगदी कोंबडी, बकरा, डुक्करच काय गायही खायला मी तयार आहे.... हो, इथल्यापण गाई पवित्र असतील असं मला वाटत नाही! पवित्र असत्या तर 'या' लोकांनी पापांचा एव्हरेस्ट उभा केला असला पाहिजे, पण 'या' लोकांचे काही वाईट होतयं असं तर दिसतं नाही... बहुतेक 'या' सगळ्या पापी लोकांना पुढच्या जन्मी अद्दल घडत असावी... पाकिस्तानात नाहितर सोमालियात जन्माला येउन ;)

... हां, तर मी काय म्हणत होतो... मी काहीही खायला तयार आहे, पण दुसरी समस्या अशी की इथलं मासाहारी जेवण कशाचे आहे ते अगदीच obvious दिसतं. ही लोकं जे खातात 'त्याचीच' चव त्यांना हवी असते. त्यामुळे बहुतेक जास्त न शिजवता, जास्त मसाले न घालता खातात.

तस मी भारतात चिकन-मटन-मासे यांची चव घेतलिये, पण चिकन-मटन मधे खास वेगळं काही वाटलं नाही. चिकन बिर्यानीत चिकन ऐवजी भाज्या घातल्या तरी खास फरक पडणार नाही (हे आपले माझे मत, कोणा दर्दीला दुखवायचे नाही) कारण आपल्याकडे चव ही मसाल्यांवर अवलंबुन आहे. (हां, मासे हे वेगळं प्रकरण) तसं इथे नाही त्यामुळे एखादा हाडाच्या (हाडं पण खाणारा?!) मांसाहारीचीपण इथे विकेट उडते! त्यामुळे आम्ही 'खास' फ्रेंच हॉटेलात जाणे टाळतो!

तर हा परिच्छेद बराचसा मी (अजुनतरी) 'न' खाल्लेल्या फ्रेंच गोष्टींचा असेल!! त्यामुळे मांसाहारी पदार्थ ऐकलेलेपण ज्यांना पचत/पटत नाहीत त्यांनी कृपया पुढच्या परिच्छेदावर उडी मारा... मी सांगण्याचं काम केलं, नंतर काय कटकट करायची नाय!
(ज्यांना वाचायचं आहे त्यांनी खालील 'पांढरी अक्षरं' सिलेक्ट करुन वाचा!)


ही लोकं जवळपास सगळ्या प्राण्यांचे जवळपास सगळे अवयव खातात. म्हणजे चीनी लोकांसारखे अगदी 'कायच्याकाय' नाही खात, तरी गाय, वासरु, घोडा, बकरी, डुक्कर, ससा, कांगारु, बेडुक, कोंबडी, कबुतर, बदक हे खातात. पण यात काही विशेष नाही, खर्‍या फ्रेंच 'डेलिकसीज्' आहेत, बेडकाचे पाय, गाईची जीभ, बदकाचं काळीज, गोगल गाय, कच्च बीफ, जिवंत ऑइस्टर लिंबु पिळुन!

गाइचे तर सगळे अवयव खातात. अगदी यकृत आणि वर सांगितलेल्या जिभेसकट. माझा सहकार्‍याच्या मते फार पुर्वी श्रीमंत लोकं गाईचं मांस खात व गरीब उरले सुरले अवयव. कालांतराने हा भेदभाव राहिला नाही (बहुतेक फ्रेंच राज्य क्रांतीच्या वेळी असेल ;) माहिती आहे ना... स्वातंत्र-समता-बंधुता!!) सध्या हे अवयव असलेली डिश स्पेशल असते, कारण एका गाईत एकच जीभ!!

इथल्या डीश कशाच्या आहेत ते 'दिसते'!! आख्खा मासा (तोंड,डोळे,खवल्यांसहीत) ताटात (आपल्याकडे बघत) बसलेला असतो. झिंगा तर त्याच्या मिशां आणि पायांसकट ताटात वाट बघत असतो... असं वाटतं की आपण जवळ गेलो तर टुणंकन उडी मारेल!! माझ्या सहकार्‍याच्या मते यामुळे तो पदार्थ किती ताजा आहे ते दिसतं... बरोबर पण आहे म्हणा, आता आख्ख सफरचंद ताज आहे का नाही हे ओळखणं सोप्प, पण तेच फोडी करुन फ्रुट-सॅलॅडमधे घातलं तर थोडं शिळं असेलं तरी खपुन जातं. हे पण तसचं असणार, पण मला असे प्राणी ताटात बघायची सवय नाही, पण ह्या लोकांसाठी ते फक्त अन्न आहे!



फ्रेंच जेवणात मला सगळ्यात आवडीचा भाग म्हणजे 'डेसर्ट' ... उम्म्म्म्म.. तोंडाला पाणी सुटतं. पक्का शाकाहारी सॅलॅड, फ्राइज् आणि डेसर्ट यावरचं जिवंत राहातो. पण कधी कधी राँग नंबरही लागतो. पेस्ट्री फक्त दिसायलाच चांगली असते!

पिण्याबाबत तर बोलायलाच नको... सगळ्यांनाच माहीती असेल फ्रांसमधे काय पितात ते! 'वाईन' म्हणजे यांचा जीव का प्राण. माझा फ्रेंच बॉस तर रंग-वास-चव यावरुन वाईनचा प्रकार (लाल, पांढरी, गुलाबी), फ्रांसच्या कुठल्या प्रदेशात तयार केली आहे, साधारण किती सालची आहे हे सगळ (बिनचुक) सांगतो! आपल्याकडे सध्या प्रचार केला जातो की वाइन प्रकृतीला चांगली असते, रोज थोडी घ्यावी. आता ह्यात तथ्य कितपत आणि भारतीय वाइनचे मार्केट वाढवायचा उद्देश किती ते मला माहीती नाही!! पण इथे 'ढोसायची' म्हणुन घेत नाहीत आणि 'आरोग्यवर्धक' म्हणुनही घेत नाही. इथे वाईन ही दारु नाही, जेवणाच्या प्रकारानुसार वाईनचा प्रकार बदलतो, म्हणजे लाल मांसाबरोबर (गाय, डुक्कर वगैरे) लाल वाईन, मासे असतील तर पांढरी असं. बियर, व्हिस्की, रम यांना एवढा मान नाही!

आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे, पाणीही पितात इथली लोकं आणि इथे हॉटेलमधे साधं पाणी मिळतं... बर्याच जणांची तक्रार ऐकली की इथे पाणी देत नाहीत, म्हणुन मुद्दाम सांगितलं. जेवण झाल्यावर इथे ब्लॅक कॉफी जरुर पितात. मी देखिल घेतो कधि कधि घेतो, मस्त तरतरीत वाटतं (दुपारी काम करताना झोप येत नही :) )

मी इथे खाल्लेल्या भारतीय व न खाल्लेल्या फ्रेंच खाण्याबद्दल बरचं लिहिलं... आता पुढच्या भागात मी खाल्लेल्या (आणि मला आवडलेल्या) आंतरराष्ट्रीय डिशेसबद्दल ...

शुक्रवार, १७ जुलै, २००९

Fête Nationale (पॅरिस, फ्रान्स)

Fête Nationale (फेत नासिओनाल) म्हणजेच बास्टाइल डे. याबद्दल माहीती इथे मिळेल. साधारण आपल्या २६ जानेवारी सारखा फ्रेंच दिवस. परेड पण असते!.

यावर्षी भारताने फ्रेंच अध्यक्ष सार्कोझींना २६ जानेवारीला प्रमुख पाहुणे म्हणुन बोलावले होते. लगेच त्यांनी हिसाब बराबर केला! भारताच्या पंतप्रधानांना बास्टाइल डे ला बोलावले. शिवाय आपले सैनिकही (बहुदा भारताबाहेर पहिल्यांदाच) परेड करणार होते. भारतात कधी पंतप्रधानांच दर्शन शक्य नाही ... इथे बघायला मिळेल असं वाटलं होतं.... कारण फ्रेंच अध्यक्षांना बघणं येवढ अवघड नाही! मागच्या वेळी याच दिवशी मी बघितलं होतं त्यांना.

मला वाटलं एक अनुभव लिहायला मिळेल! पण कसलं काय... भारतीय सैन्याची (त्यातुन मराठा लाईट इंफंट्री) परेड आणि आपले पंतप्रधान VIP जागीच राहिले :-( आम्हाला कधी दिसलेच नाहीत.

... पण तरी म्हणलं 'भेटलो नाही' हे तरी सांगाव!!
तर, या समारंभाचे थोडे फोटो...

१३ जुलै, रात्री (सध्या उन्हाळा असल्याने रात्र ११ ला होते!) आमच्या महानगरपालिकेच्या इमारतीसमोर
लेझर शो झाला...



मग आतिशबाजी झाली...



१४ जुलै, सकाळी १० ला अध्यक्ष सार्कोझी यांनी सैन्यदलाची सलामी स्विकारली...



परेडची सुरवात विमानांनी केली...



विविध दलाची पथके आमच्यासमोरुन जाउ लागली...







अगदी अग्निशामक दलासकट! (हो... त्यांनीतर सर्वात जास्त टाळ्या घेतल्या)...



मग, वेगवेगळ्या गाड्या...





मग रनगाडे...



शेवटी, हेलिकॉप्टर...



ही परेड झाली 'प्रसिद्ध' शॉन्सेलिसे (Champs-Élysées) या रस्त्यावर...



परेड संपल्यावर आम्ही 'ले-झाँवालिद' (Les Invalides) समोरील मैदानात असलेल्या प्रदर्शनात गेलो.
तिथे हेलिकॉप्टरमधे बसलो,



चिलखती गाडीत बसलो,



सैनिकांबरोबर फोटो काढले,



सैनिकांचे फोटो काढले (त्या टर्मिनेटर मधल्या अरनॉल्डच्या बंदुकीसाठी :-) )...



गाडीवर फोटो काढले...



आणि बंदुक हतात घेउन फोटो काढले!!



एकंदर मजा केली.... बंदुका-रनगाडे-विमानं हा माझा वीक पॉइंट आहे ना!!

यानंतर, पुढचं लक्ष - आयफेल टॉवर वरील आतिशबाजी! त्याआधी घरी जाउन ताजेतवाने होउन, तिथल्या गर्दीला सामोरं जायला सज्ज झालो... हो ना, लाखो लोकं येतात तिकडे! मला कशीबशी आर्धा टॉवर दिसेल अशी जागा मिळाली :-) त्यामुळे हा शो मी 'अर्धा' बघितला!! असा...


अशा शो चे फोटो काढायचे म्हणजे चांगला कॅमेरा-ट्रायपॉड वगैरे पाहिजे...

मोजुन अर्धा तास आतिशबाजी सुरु होती... लाजवाब! (यू ट्यूबवर पहा...)

----------------------------------

मागील वर्षाचे फोटो पिकासावर पहा.