मागच्या भागात पॅरिसमधील भारतीय व फ्रेंच खाण्याबद्दल लिहिलं. आता काही मी खाल्लेल्या (आणि मला आवडलेल्या) आंतरराष्ट्रीय डिशेसबद्दल ...
मोरोक्कन:
पुर्वी मोरोक्कोत फ्रेंच लोकांची वसाहत असल्याने बरीच मोरोक्कन हॉटेल इथे आहेत. ही हॉटेल्स आतिल-बाहेरील नक्षीदार सजावटीमुळे एकदम उठुन दिसतात. अगदी अरेबियन नाइटस् किंवा अल्लादिनची आठवण करुन देणारी! पण इथेही फक्त नॉनवेज! ते फ्रेंचांसारख उघड दिसणारे नाही. चांगलं शिजवलेलं असतं. माझ्या (एका ज्ञानी) फ्रेंच सहकार्याच्या मते, युरोपात हवामान थंड असल्याने मांस जास्त न शिजवता खाउ शकतात, पण आफ्रिका / दक्षिण आशिया इथल्या उष्ण हवेमुळे अन्न चांगलं शिजवुनच घ्याव लागतं!
तर मोरोक्कन हॉटेलात असेही जास्त पर्याय नसतात. इथले पदार्थ म्हणजे कुसकुस (Couscous) आणि ताजिन (Tajine).
कुसकुस म्हणजे आपल्या वरीच्या तांदुळासारखा दिसणारा प्रकार. त्याच्याबरोबर घ्यायला गाजर, बटाटे व इतर भाज्याचे मोठ्ठे मोठ्ठे तुकडे घातलेला पाणीदार रस्सा आणि चिकन/मटन/सॉसेज/बीफ यातलं काहीतरी. वरुन घालण्यासाठी भिजवलेले बेदाणे, छोले तसंच मस्त तिखट सॉस! (आपल्यासारख्या) शाकाहारींसाठी बरोबरचा मांसाहार नसलेली शाकाहारी व्हरायटी पण घेता येते. इथे वर्णन करता आले नसेल पण मस्त लागते ही डिश.
पण मला आवडलेली डिश म्हणजे 'ताजिन'. यासाठी स्पेशल मातीचं भांड असतं. त्या भांड्यात सगळ्यात खाली चिकन/मटन/बीफ चा तुकडा त्यावर गाजर, बटाटा व इतर भाज्यांचे मोठ्ठे तुकडे, वेगवेगळे मसाले, काही अंबट-गोड फळांचे तुकडे, थोडे दाणे... हे सगळं भट्टीत १५-२० मिनीट झाकुन शिजवायचं... वरच्या सगळ्या पदार्थांची चव त्यात अशी भिनते, मांस/भाज्या शिजुन मस्त मउ झालेल्या असतात. आहाहा काय मस्त लागतं म्हणुन सांगु! पण यात शुद्ध शाकाहारी पर्याय नाही!
मोरोक्कन मधेपण आपल्यासारखचं, जेवताना पाणीच प्यायचं आणि जेवण झाल्यावर त्यांचा चहा घ्यायचा. त्या चहाचा आणि आपल्या चहाचा काही संबंध नाही. त्यांचा चहा म्हणजे गरम पाणीचं, पण चव मस्त असते! त्याहुन मस्त म्हणजे नक्षिदार सुरइ-ग्लास आणि त्या ग्लासात चहा ओतायची कसब. उंचावरुन सुरइतुन कपात चहा ओतताना बघुन आपल्यालापण तसा प्रयत्न केल्यावाचुन राहावत नाही!
जपानी:
इथे प्रत्येक गल्लीत एक जपानी हॉटेल असते! त्यांची प्रसिद्ध डिश म्हणजे सुशी आणि माकी. मी ऐकुन होतो की सुशीत कच्चा मासा असतो, पण मला काही केल्या विश्वास बसत नव्हता. मला एकच प्रश्ण, "कच्चा कशाला?"! शेवटी प्रत्यक्ष खाल्यावरच विश्वास बसला. सुशी म्हणजे भाताच्या छोट्या मुदीवर कापलेला मासा, तो सॉसमधे बुडवुन चॉपस्टिकनी धरुन खायचा! हो... थोडा प्रयत्न केल्यावर मी चॉपस्टिकनी भातही खाउ शकलो. जपानी जेवणात शेवया (नुडल्स्) नाहीत. यांच्याकडे भात, मासे व इतर (सर्व) सागरी प्राणी खातात. मला तर वाटतं आपल्याला बागेत भेळेच्या गाड्यांसमोरुन जाताना जसं वाटतं (उम्म्म्म्) तसं यांना मत्स्यालयात वाटत असणार! जे काही मासे आत्तापर्यंत खाल्लेत त्यात 'सालमन' मला सगळ्यात आवडला.
जपानी जेवणाबरोबर प्यायची 'साकी', म्हणजे जपानी दारु. ती गरम असते हे मला पिल्यावर (तोंड भाजल्यावर) कळलं. चव ठिकठाकच... पण चवीसाठी दारु कोण पितो! त्यातुन मी रसना/कोकम/लिंबु सरबत आवडणारा त्यामुळे याहुन जास्त मत देउ शकत नाही!
चायनीज:
जगात सगळीकडे चायनिस हॉटेल भरपुर आहेत असं ऐकलं होतं. पण इथे नाहीत. क्वचीत कुठेतरी दिसतात. अर्थात चायनीज पदार्थ प्रत्येक देशात वेगवेगळ्या चवीचे असतात हे पुन्हा सांगायची गरज नाही! आम्ही तर एकदाच गेलो होतो... काही खास सांगण्यासारख पण नाही :(
थाई:
थाई लोकं दिसायला चीनी असली तरी त्यांचं जेवण बरचं आपल्यासारखं असतं! आपण (निदान मी तरी) या सगळ्या लोकांना 'चीनी'च म्हणतो पण आपापसात प्रचंड तफावत असते म्हणे (बहुदा जसं मराठी, गुज्जू, बिहारी आणि बंगाली या 'इंडियन्स' मधला फरक). थाई जेवणात मसाले फक्त आपल्यापेक्षा थोडे कमी असतात. नारळाचा भरपुर वापर करतात. हे जेवण पण मला फार आवडलं. शाकाहारी पर्याय मात्र जास्त नसतात. त्यामानानं सी-फुड बरचं असतं. आम्ही मोठ्या मुश्किलीनी 'व्हेज फ्राइड राइस' करायला सांगितला (तेंव्हा फ्रेंच काहीच येत नव्हतं)... अगदी आपल्या इथल्या सारखा केला होता!
इटालियन:
इटालियन हॉटेलही इथे बरीच आहेत... बहुधा सगळीकडेच असतात. यांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शाकाहारी डीशेस.. त्याही भरपूर! यांच्या बेसिक डिशेस म्हणजे पिझ्झा आणि पास्ता. पिझ्झामधे साध्या 'मार्घेरिटा' पासुन सुरु होउन बर्याच प्रकारचे शाकाहारी पिझ्झे मिळतात. पास्ता तर अनेक प्रकारचे असतात. त्यामधे नेहमीचे म्हणजे स्पॅघेटी (Spaghetti), राविओली (Ravioli), फुसिली (Fusilli), पने (Penne)... जास्त मसालेदार नसले तरी चवीला मस्त.
आमच्या कँटिनमधे बर्याच वेळा 'लसान्य' ही अजुन एक इटालियन डिश खायला मिळाली. सपाट पास्ता, चीज, टोमॅटो सॉस, बारिक तुकडे केलेलं बीफ यांचे एकावर एक थर, अशी ही डिश. भरपुर तेल घातलेली ही डिश ब्रेडबरोबर खायला मजा वाटते.
या सगळ्यामुळे, इटलीला गेल्यावर खायचे हाल होणार नाहीत असं वाटतय!
तिबेटि:
तिबेटी जेवण जेवायचा योग अचानकच आला... तेही अगदी Valentine Day ला! जेवणाबरोबरच हॉटेलची अंतर्गत सजावटही आकर्षक होती. तशी टिपिकल सजावट... दलाइ लामांचा मोठ्ठा फोटो आणि लाल रंगाचा भरपुर वापर. तिच ती चार तिबेटी संथ गाणी लावलेली (त्यातलं एक तर ऐकुन ऐकुन आम्हाला पाठही झालं!!)
इथेही शाकाहारी पर्याय बरेच होते. पदार्थ आपल्यासारखे मसालेदार नसतात. त्यातला एक मोमोस नावाचा आपल्या मोदकासारखा (पण गोड नाही) प्रकार असतो. डेसर्ट पण मस्तच होते. राइस पुडिंग सारख काहितरी...
इथे मात्र कुठलीही दारु आम्ही प्यायलो नाही! (दलाइ लामांसमोर दारु प्यायची!!) इथे प्यायचा चहा... हाही आपल्यासारखा नाही... मी घेतलेला लोण्याचा चहा (Butter Tea) तर मस्तच होता.
तशी आम्हाला आत्तापर्यंत दोनच तिबेटी हॉटेल्स दिसली. ऑफिसमधे आल्यावर बघितलं तर कोणाला माहितीच नव्हतं... मग आपल्या शेजार्यांच्या (तिबेट) जेवणाची जरा स्तुती केली, बघु कोणी फ्रेंच सहकारी जातोय का ते!
तर... आत्तापर्यंत एका वर्षात काहीह मुद्दाम न ठरवता येवढ्या चवी घेउन झाल्या. आता बघु पुढच्या वर्षभरात अजुन किती देश या यादित फोडता येतात ते....
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २००९
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)