गुरुवार, २९ ऑक्टोबर, २००९

ऑस्ट्रियाची सफर.. भाग दुसरा-शेवटचा (साल्झबर्ग आणि इन्सब्रुक)

पहिल्या भागात व्हिएन्ना आणि बुडापेस्ट फिरुन आलो. आता पुढचा टप्पा होता साल्झबर्ग आणि इन्सब्रुक. सगळा प्रवास ऑस्टियन रेल्वेने, स्वस्त आणि मस्त! व्हिएन्नाला आल्यावरच पुर्ण प्रवासाचे आरक्षण केले होते. रेल्वे स्थानकांजवळची हॉटेल महिनाभर आधीच आरक्षित केले होते. साल्झबर्ग ही दादाची शिफारस होती तर इन्सब्रुकला स्वारॉस्की क्रिस्टल वर्ल्ड बघायला जायचं होतं.

बुधवारी सकाळी व्हिएन्नाहुन निघुन साल्झबर्ग, तिथुन दुसर्‍या दिवशी रात्री इन्सब्रुक आणि शुक्रवारी रात्री परत व्हिएन्ना असा दौरा होता. साल्झबर्गला पोचल्यावर बघतो तर धो धो पाऊस... रेल्वे स्थानकावरच असलेल्या प्रवासी मदत केंद्रातून माहिती घेतली. इथे तशा बर्‍याच सफरी आहेत, आम्ही दुपारी निघणारी 'डोंगर आणि तळी' (Lakes and Mountains) ही सफर आरक्षित केली. इथे या सफरी घेउन जाणर्‍या दोन संस्था आहेत साल्झबर्ग साइटसीइंग आणि पॅनॅरोमा टूर्स. त्यापैकी आम्ही साल्झबर्ग साइटसीइंग नी गेलो कारण त्याच तिकिटावर दुसर्‍या दिवशी शहरात फिरायला हॉप-ऑन-हॉप-ऑफ बस दोन तास फुकटात मिळणार होती.

हॉटेलात जाइपर्यंत पाऊस पडतच होता. सफर वाया जाणार या तयारीने आम्ही सांगितलेल्या जागी पोहोचलो. पावसामुळे बर्‍याच जणांनी सफर रद्द केली होती त्यामुळे दहा जणांच्या गाडीत आम्ही दोघं, एक दुसरा चिंकी पर्यटक आणि आमची गाइड कम चालक एवढे चारच जण होतो. जास्त आपेक्षा न ठेवता सफर सुरु झाली. आमची चालक-कम-गाइड शहरातुन जाताना शहराचा इतिहास-भुगोल सांगत होती.

जर्मनमध्ये 'साल्झ' म्हणजे 'मीठ' आणि 'बर्ग' म्हणजे 'किल्ला'. या शहराच्या आजुबाजू डोंगरात खनिज मीठ मुबलक प्रमाणात होते. या मिठाची बाजारपेठ म्हणून हे शहर नावारूपाला आलं. त्याचबरोबर इथल्या धर्मप्रमुखाचे पदही बरेच शक्तिशाली झाले. शहराच्या मध्यभागी असलेल्या डोंगरावर किल्ला बांधून त्यात तो राहत असे. शहर आणि तो किल्ला आम्ही उद्या फिरणार होतो. आज शहराबाहेराची तळी आणि डोंगर बघणार होतो. वेळेअभावी अजून काही करणं शक्य नव्हतं, नाहीतर इथल्या खनिज मिठाच्या खाणींची सफरही आकर्षक होती. शहराच्या आजु बाजु आल्प्स पर्वत रांगा आहेत. पाउस-पाणी मुबलक. त्यामुळे ७० टक्के वीज ही जलविद्युत आहे (स्वस्त आणि तुलनेने पर्यावरणाला कमी हानिकारक) त्यामुळे सार्वजनिक वाहतुक करणार्‍या बसही विजेवर चालतात.

आमच्या गाडीनी शहर सोडलं आणि वळणदार रस्त्याने एक डोंगर चढू लागली तेंव्हा अचानक ढग दूर झाले आणि सूर्य बाहेर येऊ लागला. तो डोंगर पार करेपर्यंत मस्त उन पडले. आता आम्ही खेड्यात आलो होतो. आजूबाजूला मोजकी घरं आणि विस्तीर्ण माळरान. असं वाटत होतं कि चारी बाजूला विन्डोसचा वॉलपेपर लावलाय.





मिठाच्या व्यापाराबरोबर इथला दुसरा मुख्य धंदा दुधाचा. या माळरानात अनेक गाई चरत असलेल्या दिसत होत्या. आमची गाईड त्यांना happy cows म्हणे... कारण त्यांना कोणी खाणार नव्हतं! त्या गाईडचे सामान्य ज्ञान अगदीच सामान्य नव्हतं. भारतात holly cows असतात हे ही तिला महिती होतं!!

आजूबाजूला काही तासांपूर्वीच धुऊन काढलेले मस्त हिरवे गार डोंगर होते. त्यावर गाई-गुरं (क्वचित पाळलेली हरणं देखिल) चरत होती. मागे राहिलेले काही ढग टंगळ-मंगळ करत होते. मध्ये मध्ये लहान मोठी तळी होती. असं वाटतं होतं की कुठलातरी हॉलिवुडपट बघतोय. मी स्वतः हे बघतोय यावर विश्वासच बसत नव्हता. याआधी 'आयफेल टॉवर' समोर मला असंच वाटलं होतं. आमच्या गाईडनी सांगितलं की इथे घर बांधायचं असेल किंवा काही बदल करायचे असतील तर फार अवघड जातं, कारण सरकार पासुन पार शेजार्यांचीही परवानगी घ्यावी लागते. शिवाय पर्यटन विभाग परिसराच्या सौंदर्याला काही बाधा होणार नाही याचीही काळजी घेतो.





या सफरीत पाच सहा तळी दाखवली जातात आणि एका मोठ्या तळ्यातून फेरी बोटीतून पलीकडल्या गावात घेऊन जातात. थोड्याच वेळात ते सेंट गील्गन नावाचं गाव आलं. हे मोझार्टच्या आईचं गाव. गाव छोटं आणि अगदी टुमदार!



आम्ही बोटीच्या धक्यावर गेलो. पाऊस थांबला होता तरी हवेत गारवा होता. आम्हाला बोटीची तिकिटे देऊन आमची गाईड गाडी घेऊन तळ्याला वळसा घालून पलीकडे गेली. आम्हाला बजावून गेली कि सेंट वुल्फगांग या गावी न चुकता उतरा!



आम्ही बोटीच्या डेकवरून आजूबाजूचे डोंगर बघत होतो. दोन-तीन थांब्यानंतर आमचा थांबा आला. धक्यावर गाईड होतीच. गाव आणि तिथल्या चर्चची चक्कर मारताना गाईडने त्या सेंट वुल्फगांग यांची कथा सांगितली. याच गावातून एक छोटी रेल्वे वरती डोंगरावर चढून जाते. तीव्र चढावर चालण्यासाठी रॅक-पिनिअन वापरणारी हि रेल्वे अजूनही वाफेच्या इंजिनावर चालते. आम्ही गेलो तेंव्हा ती चालू नव्हती. तिचे वेळापत्रक इथे कळेल.



आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. हा रस्ता वेगळा होता, यावरही अजून एक दोन तळी होती... प्रत्येक तळ्याची काही दंतकथा होती पण आमच्या सफारीचा उच्च बिंदू येऊन गेला होता त्यामुळे हे तळे बघितले तरी लेक वुल्फगांगचीच आठवण येत होती.

साधारण तीन-चार तासात आम्ही साल्झबर्गला परत आलो. हॉटेलात थोडा आराम करून पोटपूजेची जागा शोधात फिरू लागलो. इथे एक बरं असतं की मेनू बाहेरच लिहिलेला असतो. असाच एक मेनू बघून आत गेलो. आतली सजावट अनोखीच होती. एक आख्ख घर तयार केलं हकेलं, अगदी वाळत टाकलेल्या कपड्यांसकट! प्रत्येक खोलीत टेबल-खुर्च्या होत्या. आम्ही दिवाणखान्यात बसून जेवलो... मी घेतला सालमन मासा आणि बायकोसाठी चीज-बटाटे असलेली कसलीतरी ऑस्ट्रिअन डिश होती.



दुसर्‍या दिवशी साल्झबर्ग शहर बघायला सकाळी लवकरच बाहेर पडलो. कालच्या सफरीच्या तिकिटावर आज त्याच कंपनीची हॉप ऑन-हॉप ऑफ बस दोन तासासाठी मोफत होती. आज हवामान एकदम मस्त होतं. ही तर युरोपातल्या हवेची खासीयत आहे... एका रात्रीत हवामान यू-टर्न घेते. आज निरभ्र आकाश आणि गरम हवा होती. बस घेऊन आम्ही शहरातून निघालो. प्रत्येक ठिकाण पाहायचा मूड नव्हता. अजुनही कालची सफरच डोक्यात होती. दादाने हेल्ब्रून महालामधली कारंजी जरून बघायला सांगितली होती त्यामुळे आम्ही हेल्ब्रून महालाच्या थांब्याला उतरणार होतो आणि पुढच्या बसनी बाकीची सफर पूर्ण करून मुख्य शहर आणि मधल्या डोंगरावरचा किल्ला बघणार होतो.



आमच्याच बसमध्ये असलेले एक 'देसी' कुटुंब आमच्याबरोबर हेल्ब्रूनला उतरले. बोलता बोलता त्या काकांनी सांगितले की त्यांच्या मुली जर्मनीमध्ये शिकतात आणि ते पती-पत्नी त्यांच्याकडे आले होते. बसमधून मला बाहेरचे निसर्ग सौंदर्य बघू न देता हे श्रीमान मला सांगत होते कि ते इथे इटलीहून आले आणि त्यांना काही इथे यायचं नव्हतं, हे काही त्यांना 'खास' वाटत नव्हतं. पण त्यांच्या मुलिंनी आधीच हे ठरवलं होतं, आणि ट्याँ..ट्याँ..ट्याँ !! उतरल्यावर त्यांना करंज्या बद्दल सांगितलं पण त्यांना काही त्यात रस नव्हता.

त्यांना कसबसं कटवून आम्ही कारंजी बघायला गेलो. तो काय प्रकार होता (तो म्हणजे कारंजी.. काका नाही) याचा आम्हाला काही अंदाज नव्हता. तिकीट खिडकीवर कळले की कारंजांची गायडेड टूर असते. आमची टूर काही मिनिटातच सुरु झाली. आमच्याबरोबर युरोपातल्या कुठल्यातरी शाळा-कॉलेजातली बरीच मुलं-मुली होती. गाईडनी आधी आम्हाला एका ठिकाणी बसवून या जागेचा इतिहास सांगितला. आमच्या समोर दगडी टेबल-खुर्च्या होत्या त्यावर आमच्यापैकीच काही उत्साही मंडळींना बसवलं.

(सुचना: तुम्ही साल्झबर्गला जायची १% शक्यता जरी असेल तर कारंज्याची वर्णने वाचू नये... काहीही माहित नसताना गेलात तर दुप्पट मजा यइल!! त्यामुळे खालील वाक्य पांढर्‍या रंगात आहेत... सिलेक्ट केल्यावर वाचू शकाल.)




मग टेबलाच्या अजुबाजुची कारंजी चालू केली. सर्वांना आश्चर्य वाटले कारण तिथे करंजी असतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्या धाक्यामधून सावरतोय तोवर खुर्चीवर बसलेल्या मंडळींनी उड्या मारल्या... त्यांच्या खालून कारंजी सुरु झाली होती.

टेबलावरच्या कारंज्यांचा फोटो

आम्हाला लांब बसून बघायला अर्थातच मजा येत होती. ती कारंजी बंद करून गाईडने सगळ्यांना पुढे जायला सांगितले. आम्ही जात असताना अचानक खालच्या दगडी फरशांच्या मधून पाणी आलं!! मग एकंदर कल्पना आली की आपला 'मोरू करायला बांधलेली मयसभा' आहे.

यापुढे पहिल्यांदा कारंजी कुठे कुठे आहेत ते प्रत्येकजण बघत होता. कितीही काळजीपूर्वक बघितलं तरी कुठूनतरी भलतीकडून पाणी यायचाच!

पुढे गाईड आम्हाला एका गुहेत घेऊन गेला. तिथे वेगवेगळ्या पक्षांचे आवाज येत होते. एका राक्षसाचा मुखवटा जीभ बाहेर काढून आणि डोळे वटारून सगळ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. गाईडने सांगितले की हे सगळे आवाज आणि यांत्रिकी हालचाल फक्त पाण्याच्या जोरावर चालतात! मधे ठेवलेला एक मुकुट देखील पाण्याच्या फावार्यावर हवेत वर-खाली होत होता! हे पाहून आम्ही गुहेतून बाहेर पडतच होतो... वाटलं की इथे आम्हाला भिजवणार नाही, पण तेवढ्यात बाहेर कारंजी सुरु झाली.

हवेतल्या मुकुटाचे छायाचित्र
बाहेरच्या कारंज्यांचे छायाचित्र

हे सगळं तो गाईडच वेगवेगळ्या तोट्या चालू बंद करून करत होता. आता लोकांनापण मजा वाटत होती. त्यात आमच्याबरोबर कॉलेजमधली मुलं-मुली असल्यामुळे तर फारच उत्साही वातावरण झालं होतं! पुढे एक मोठ्ठा शहराचा देखावा होता... आपल्याकडे गणपतीला असतो तसा. त्यात बर्याच छोट्या छोट्या बाहुल्या वेगवेगळे काम करत होत्या. ह्या सगळ्या हालचाली देखील पाण्याचा दाब आणि यांत्रिक जोडणी वापरून केल्या होत्या. इथे पाणी फक्त 'ब्याकस्टेज'ला होतं.

देखाव्याचे छायाचित्र


अजून थोडी कारंजी बघून आमची सफर संपली. अर्धा तासही लागला नाही पण आम्ही एकदम ताजेतवाने झालो. कालच्या सफरीनंतर त्याहून भारी काही असेल असं वाटलं नव्हतं. पण नाही... पिक्चर तो अभी बाकी है दोस्त!! नशिबाने थंडीही नव्हती त्यामुळे भिजायलापण आवडलं! मग त्याच तिकिटावर तो छोटासा महाल आतुन बघितला. 'साउंड ऑफ म्युसिक' या प्रसिद्ध हॉलिवूडपटाला साल्झबर्गची पार्श्वभूमी आहे. त्यामधे या महालाबाहेरील एक काचेची खोलीपण आहे. या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी विशेष सफरदेखिल साल्झबर्गमधे आहेत. पुढची बस पकडायला थांब्यावर आलो तर तिथे मगाशीचे 'देसी' काका पण होते... कारंजांचे मस्त वर्णन करून सांगितलं त्यांना! काही मिनिटातच बस आली आणि आम्ही पुढच्या सफरीवर निघालो.

बसने आम्ही शहरात परत जाऊन थोडं खाल्लं आणि सैरसपाटा सुरु केला. प्रत्येक युरोपियन शहरात असतं तसं इथेपण एक 'वैशिष्टपूर्ण' चर्च, त्यासमोर एक चौक, एक जुना रस्ता, एक ऐतिहासिक इमारत आणि शहरामधून जाणारी नदी हे सगळं आहे... वेगळी गोष्ट काही आहे ती म्हणजे शहरामधल्या डोंगरावरचा किल्ला!

एक 'वैशिष्टपूर्ण' चर्च: साल्झबर्गर डोम



त्यासमोर एक चौक: डोमप्लाझ



एक जुना रस्ता: गेत्रेइदेगस्स



एक ऐतिहासिक इमारत: मोझार्टचे जन्मस्थान



मधून जाणारी नदी: साल्झाक



डोंगरावरचा किल्ला: होहेनसाल्झबर्ग



तर अर्थातच सांगण्यासारखी गोष्ट आहे हा किल्ला! आपल्या महाराष्ट्रासाराखेच ऑस्ट्रिआमधेपण आम्हाला बरेच डोंगरी किल्ले दिसले. साल्झबर्गच्या किल्यावर चढायची गरज नाही. एक कॉग रेल्वे सरळ वर (किल्यावर) नेते! वरती किल्यावर तर फिरता येताच, शिवाय तटबंदीच्या 'आतमध्ये' घेऊन जाणारी एक सफरही आहे. ऑडिओ गाईड आणि सुरक्षा रक्षका बरोबर पर्यटकांच्या समूहाला पाठवलं जातं. आपण एका दरवाज्यातून आत जातो आणि तटबंदीवरून (आणि मधून) फिरून दुसर्या दारातून बाहेर पडतो. आतमध्ये ऑडिओ गाईडवर किल्ल्याचा इतिहास-भूगोल सांगितला जातो. या किल्यात इथला आर्च बिशप राहायचा. आधी फक्त त्याला राहण्यापुरता असलेला हा किल्ल्याचा आकार, बिशापचे सामर्थ (आणि शत्रू) यांबरोबर वाढू लागला. नव्या इमारती, दुहेरी-तिहेरी तटबंदी असे करत करत बराच मोठ्ठा पसारा झाला. जिथे शत्रू वाढले तिथे लढाया या व्हायच्याच. अशाच एका लढाईत किल्ल्याला वेढा पडला. काही केल्या तो सुटेना. किल्यावर लोकांचे पोट भरायला एक एक बैल कापला जाऊ लागला. शेवटी एकाच बैल उरला होता. आता पराभव निश्चित होता. किल्ल्याखाली शत्रूची परिस्थितीपण जास्त वेगळी नव्हती. कुणाचं मनोबल पहिल्यांदा ढासळेल तो हरला! अशातच किल्ल्यावर कुणालातरी एक कल्पना सुचली. त्या शेवटच्या बैलाला रोज वेगवेगळा रंग लाऊन तटबंदीवरून खालच्या शत्रूला दाखवत फिरवले जाऊ लागले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि शत्रूंनी माघार घेतली. त्याची आठवण म्हणजे हा बैल...



आमच्या सफरीत पुढे आम्ही तटबंदीमधून काढलेल्या छोट्या छोट्या मार्गांवरून पुढे गेलो. कधी कधी गोल जिन्याने वर जाऊन बुरुजावरून आजूबाजूचा परिसर न्याहाळला. शेवटी खाली उतरण्याआधी एक जुना 'म्युसिक प्लेअर' बघितला! या मोठ्ठ्या ऑर्गनमधून येणारे सूर एका फिरणार्‍या नळीवरील उंचसखल भागांवर अवलंबून असतात. इथून वाजवलेल्या या ऑर्गनचा आवाज खाली साल्झबर्गकरांना ऐकू जायचा.



अशा प्रकारे साल्झबर्गने सुखद धक्का दिला. साल्झबर्ग मस्त बघायचे असेल तर तीन दिवस तरी हवेतच. पण आम्हाला संध्याकाळी इंन्सबृकला निघायाचेच होते. रात्री इंन्स्बृकला पोचल्यावर आम्ही सरळ हॉटेलात जाऊन ताणून दिली.

सकाळी उठून इंन्सबृक रेल्वे स्थानाकासमोरून आम्ही स्वरोस्की क्रिस्टल वर्ल्ड साठी बस पकडली. बर्‍याच हिंदी गाण्यांचे छायाचित्रण इथेही झाले आहे. हा मोठ्ठा हिरवा चेहरा बर्‍यापैकी परिचयाचा झाला आहे.



आतमध्ये प्रदर्शनात काचेच्या स्फटिकाची जादू बघायला मिळते...




इथले स्वरोस्कीचे दुकानही बरेच मोठ्ठे आहे. मला आख्या ऑस्ट्रियामध्ये जेवढे देसी दिसले नाहीत इतके या दुकानात दिसले... प्रदर्शनात नाही... इंन्सब्रूक शहरातही कोणी नव्हते!! भारतातून युरोप वारीला आलेली हि प्रजा इंन्सबृकला फक्त स्वरोस्कीच्या दुकानात आले होते. आम्हीदेखील तुरळक खरेदी करून इंन्सबृक शहरात परतलो.

इथून इंन्सबृकची सैर सुरु झाली. इथेही मगाशी सांगितल्यासारख एक 'वैशिष्टपूर्ण' चर्च, एक जुना रस्ता, एक ऐतिहासिक इमारत आणि शहरामधून जाणारी नदी आहे.

इथले चर्च: डोम दु सेंट जाकोब


इथला रस्ता: हर्झोग-फ्रेद्रीच स्त्रास


इथली ऐतिहासिक इमारत: सोन्याच्या छताचे घर


खरतर ह्या गोष्टी सोडून बाकी इथे जास्त काही नाही. हिवाळ्यात आलात तर बाजूलाच असलेल्या आल्प्समध्ये बर्फात जाता येईल.. स्की करता येतील. पण आम्हाला संध्याकाळी आठ पर्यंत वेळ घालवणं देखील अवघड होऊन बसलं. त्यामुळे लवकरच्या गाडीने आम्ही व्हिएन्नाला परत निघालो. माझ्या वैयक्तिक मतानुसार तरी इंन्सब्रूकला जायची काही खास गरज नाही.. स्वरॉस्कीला जायचं नसेल तर!

बाकी सफर मस्त झाली. रात्री दादा व्हिएन्ना रेल्वे स्थानकावर घ्यायला आला होताच! ऑस्ट्रियामधे शेवटचा दिवस राहुन पॅरिसला परत आलो... काय करणार... सगळ्या चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतातच! पण ऑस्ट्रियापेक्षा सुंदर देश मी याआधी बघितला नव्हता आणि नंतरही बघेन असं वाटत नाही.

बुधवार, ७ ऑक्टोबर, २००९

ऑस्ट्रियाची सफर.. भाग एक (व्हिएन्ना आणि बुडापेस्ट)

आता जाउन देखिल बरेच महिने झाले... मागच्या वर्षी मे मधे आठवडाभर सुट्टी काढुन ऑस्ट्रियाला गेलो होतो. व्हिएन्नाला माझा मावसभाउ असतो. त्यामुळे संधी मिळाली की तिकडे जायचेच होते. आपलं कोणी असेल तर सगळं कसं निवांत होतं... दोन महिने आधी भावाला फोन करुन तो आहे का ते विचारुन घेतलं आणि विमानाची तिकीटे काढली. कधी नव्हे ते जाताना ऑस्ट्रियन आणि येताना एअर फ्रान्स ची तिकिटं स्वस्तात (हे महत्वाच!) मिळाली. जरा बरं वाटलं की यावेळी सामान चेक-इन करुन नेता येइल! [१] पण त्यानंतर आठवडाभराची आखणी भावावर सोडुन दिली... ते निघण्याच्या आठवडाभर आधिपर्यंत आम्ही काही म्हणजे काहीही विचार केला नाही!

व्हिएन्ना तर बघायचं होतंच, त्याबरोबर आधी प्राग (चेक रिपब्किक) आणि बुडापेस्ट (हंगेरी) बघाव असं चाललं होतं...(म्हणजे अजुन दोन देशही झाले असते!) पण बुडापेस्टला भाऊच नेणार होता (एका दिवसात!) आणि प्राग तसं लांब पडतं. मग वाटलं ऑस्ट्रियाच नीट पाहावं. त्यामुळे साल्झबर्ग आणि इन्सब्रुक (स्वारोस्की क्रिस्टल्स् फेम) बघायचं ठरलं.

जाताना ऑस्ट्रियनच्या विमानात गरमागरम जेवण काय सही होतं, शाकाहारी पर्याय देखिल होता... सगळ्या विमानात नसतात... स्वस्त विमानात तर काहीच (फुकट) मिळत नाही. पण परत येताना बघितलं, एअर फ्रान्स मधेपण थंड आणि (फक्त) मांसाहारी जेवण! 'शाकाहारी आहे का?' हे विचारल्यावर ती फ्रेंच (हवाई) सुंदरी 'नाही' म्हणाली आणि (कुणिही नं सांगता) चक्क माझ्यासमोर ठेवलेलं ते थंड चिकन उचलुन घेतलं! शेवटी मीच म्हणालो, ठिक आहे बाइ चिकन तर चिकन... काहीतरी खायला मिळुदे.

तर, १ मे रात्री आम्ही व्हिएन्नाला पोचलो. दादा-वहिनी विमानतळावर न्यायला आले होते! इथुन आमचा आराम सुरू झाला. त्यांच्या गाडीतुन थेट त्यांच्या घरी, मग मस्तपैकी घरचं जेवण... नाहीतर एरवी विमानवळावरुन मेट्रो/बस ची सोय बघा... मग हॉटेलात चेक-इन करा... ते कसं असेल काय माहीत... मग आपल्याला काहीतरी खाता येइल असे एखादे हॉटेल शोधा... केवढ्या कटकटी! आणि ही तर सुरवात असते... मग सकाळी पर्यटन कार्यालय शोधा... हॉप ऑन बस... बर्‍याच ठिकाणांपैकी आज काय करायचं? सकाळी कुठ जायचं? आणि बरेच प्रश्ण... पण इथे दादा-वहिनीवर सगळं सोडुन आम्ही निवांत होतो.

दुसर्‍या दिवशी, ठरवल्याप्रमाणे, दादा (शनिवारी) आम्हाला व्हिएन्ना जवळची दुसर्‍या महायुद्धावेळची एक छळछावणी बघायला घेउन जाणार होता... दुसरा काहीच पर्याय नव्हता, कारण रविवारी आम्ही बुडापेस्टला जाणार होतो आणि बाकी आठवडाभर त्याला ऑफिस होते.

ही छळछावणी माउथ्हाउजन (Mauthausen)या गावी आहे. व्हिएन्नाहुन ऑटोबाह्न घेउन अडीच-तीन तासात तिथे पोहोचता येत. ऑटोबाह्न म्हणजे जर्मनी-ऑस्ट्रिया मधले हमरस्ते जिथे प्रती तास १३० कि.मी. एवध्या वेगात गाड्या जातात.. पहिल्यांदा त्या वेगाची थोडी भितीच वाटते!

जर्मनी-पोलंड इथल्या मानानी ही छळछावणी तशी मोठ्ठी नाही. पण क्रौर्य सगळीकडे तेच... जवळपास लाखभर लोकांनी इथे प्राण गमावले. आत्तापर्यंत फक्त ऐकले होते... प्रत्यक्ष बघणं हा थरारक अनुभव होता.

प्रवेशद्वार:


ऑडिओ गाइड सगळं ऐकणपण शक्य झालं नाही. पोटात कालवाकालव होउ लागते... ते प्रवेशद्वार, बंदिवानांची बराक्स, गॅस चेंबर, मानेत गोळी घालायची जागा, रोगी बंघकांना एकाकी ठेवण्याची जागा सगळेच पाशवी...

गॅसचेंबर:


असे म्हणतात की त्या छावणीबाहेरच्या गावातल्या लोकांना माहीतीही नव्हतं म्हणे इथे आतमधे काय चालते ते... खरं खोटं देव (किंवा हिटलर आणि कंपनी) जाणो. आता इथे बर्‍याच देशांनी स्मारके बांधाली आहेत.


इथुन व्हिएन्नाला परतताना ऑटोबाह्ननी घेतला नाही, तर डेन्युबच्या किनार्‍यानी तिच्याबरोबर वळसे घेत घेत निघालो. बाहेरच्या निसर्गसौंदर्यानी छळछावणीच्या आठवणी कधीच पुसुन टाकल्या. आम्ही जात होतो तो वखाउ प्रदेश वाइन साठी प्रसिद्ध आहे. [२] तिथल्याच एका खेड्यात दादानी गाडी थांबवली. इतके सुरेख खेडे मी याआधी पाहिले नव्हते.



छोटे छोटे दगडी रस्ते, बाजुला जुनी घरं. या खेड्यातुन एक रस्ता डोंगरावर जातो. वरती ११ व्या शतकातील किल्याचे अवशेष आहेत. वरुन आजुबाजुचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. विखुरलेले डोंगर, वळसे घालत जाणारी डेन्युब, मधेमधे रेखिव घरांचे समुह, द्राक्षाच्या बागा आणि दुरून ऐकु येणारे संगीत.. शनिवार संध्याकाळनिमित्त कुठेतरी वाजवले जाणारे... असे वाटत होते की तिथेच बसावे.



खाली आल्यावर त्या खेड्यात एका उंच लाकडावर काही सजावट दिसली. भावानी सांगितलं की इथली प्रथा आहे. त्याला मे-पोल म्हणतात. त्यानंतर ऑस्ट्रियात इतरत्र फिरताना बर्‍याच वेळा हे दिसले.



तसेच डेन्युबच्या कडेकडेने एक छोटा सायकलचा रस्ता जात होता. हा रस्ता म्हणे जर्मनी-ऑस्टिया-स्लोव्हाकिआ-हंगेरी-पुढे बाल्कन देशातुन शेवटी (डेन्युब बरोबर) काळ्या समद्रात जातो. साधारण २००० कि.मी. लांबीचा रस्ता! हौशी लोकं सायकलवर सगळं सामान घेउन प्रवास करताना आम्ही बघीतली. नदीकिनारी या लोकांसाठी खास हॉटेल (सायकल साठी विशेष सोईंसकट!) आहेत. काय काय करतील ही लोकं, काही नेम नाही. :-)

डेन्युबमधुन पर्यटकांसाठीची मोठ्ठी जहाजं देखिल चालतात.


अशाप्रकारे ऑस्ट्रियातला पहिला दिवस मजेत गेला... आता दुसर्‍या दिवशी, रविवारी, दुसर्‍या देशात! हंगेरीची राजधानी बुडापेस्टमधे!

व्हियेन्नापासुन गाडीने तीन तासावर बुडापेस्ट. दादा आधी बर्‍याच वेळा गेला होता त्यामुळे काही चिंता नव्हती. सकाळी (शक्य तितक्या) लवकर निघालो, पुन्हा ऑटोबान्ह् पकडला. दोन तासांनी हंगेरीची सीमा लागली. हंगेरी युरोपियन संघटनेत उशिरा (२००४ साली) आलेला देश. त्यांचे चेलनही वेगळे आहे. हे माझ्यासाठि नविनच होते. मला वाटे युरोपीयन संघटनेतील सगळ्या देशांचा एकच व्हिसा (श्यांगेन) आणि एकच चलन (युरो) आहे, पण तसे नाही. युरोपात युरोपीय व्यापार समुह, श्यांगेन व्हिसा आणि युरो वापरणारे असे देशांचे (आणि अजुन बरेच) वेगवेगळे समुह आहेत. त्यामुळे काही विशेष उदाहरण तयार होतात, जसे खालील सगळे देश युरोपिय संघटनेत आहेत, पण,
- इंग्लंड मध्ये युरो चलन चालत नाही आणि त्यांचा व्हिसापण वेगळा आहे.
- आयर्लंडचा व्हिसा वेगळा आहे पण तिथे युरो वापरतात.
- तर, पोलंड, स्विडन आणि हंगेरीत व्हिसा युरोपाचा पण युरो चालत नाही.

अधिक माहितीसाठी विकी बघा...

युरो चलन वापरायचे असेल तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला काही किमान अटी पुर्ण कराव्या लागतात! अर्थातच हंगेरी त्याला पात्र नाही. आम्ही गेलो तेंव्हा एका युरोला २८० हंगेरिअन चलन मिळाले. त्यामुळे तिथल्या किंमती हजारोंमधे होत्या. खरेदी करताना सहज लाखो (हंगरियन) रुपये उडवले! इथल्या किमती (ऑस्ट्रियाच्या तुलनेत) कमी असल्याने सीमाभागातील ऑस्ट्रिअन हंगेरीत खरेदीला जातो म्हणे! बुडापेस्टला पोचल्यावर बाकी युरोपापेक्षा हा देश गरीब आहे हे लक्षात येते. सार्वजनीक स्वत्छतागृह देखिल फुकट नाही. (हा काही देश गरीब असण्याचा निकश नाही... हे आपलं माझं निरीक्षण!)

व्हिएन्नामधुन पुढे डेन्युब बुडापेस्टमधून जाते. नदीच्या एका तिराला 'बुडा' आणि दुसरीकडे 'पेस्ट' वसलेले आहे (खरचं!). आख्ख शहर पाहायचं असेल तर सितादेला वरून मस्त दिसतं. सितादेला म्हणजे किल्ला. इथेच हंगेरिअन स्वातंत्रदेवतेचा पुतळापण आहे.



इथुन आम्ही बुडा किल्यावर गेलो. हा किल्लापण छोट्या डोंगरावर आहे. वरती किल्यात अजुनही वस्ती आहे. इथली मुख्य आकर्षणं आहेत फिशरमन्स बाश्चन, तिथले चर्च, मुख्य महाल आणि खाली दिसणारे शहर.

बुडा किल्यावरचा महाल:


इथे थोडी पेटपुजा केली आणि खाली उतरुन गाडिने पलिकडल्या तिरावर, पेस्ट गावात गेलो. तिथे बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे हिरोज् स्केअर (राष्ट्रीय स्मारक), जगातील पहिली मेट्रो (हंगेरीयन लोकांच्या मते) आणि मिक्लोस लोगेटीचा 'अज्ञात' पुतळा. ह्या पुतळ्याने हातात एक लेखणी धरलीये. त्या लेखणीचा रंग अजुनही मुळचा पिवळा आहे तर बाकी पुतळा 'गंजुन' काळपट हिरवा झाला आहे. त्या लेखणीला हात लावणार्‍याला म्हणे थोडे शहाणपण मिळते म्हणे. म्हणून प्रत्येकाने हात लावल्याने तिथला रंग मुळचा पिवळा राहिला आहे.



आम्हीपण थोडे शहाणपण घेउन तिथून निघालो, जगातील पहिली मेट्रो (इ.स. १८९६) बघायला. बुडापेस्टच्या मेट्रोचे बांधकाम लंडन मेट्रोच्या आधी सुरु झाले पण लंडनमधे मेट्रो पहिल्यांचा कार्यान्वीत झाली, त्यामुळे दोधेही म्हणतात की आमचीच जगातली पहिली मेट्रो! (कोणाची का असेना आपली नाहीये ना, मग आपल्याला काय फरक पडतो ;-) ) तो जुना दोन-अडीच बस एवढा फलाट त्यांनी तसाच ठेवलाय. तेवढ्यात एक मेट्रो खडखडत आली आणि आम्ही तिथून बाहेर पडलो.



आता तसे सगळे बघून झालं होतं. थोडी पेटपूजा करून रात्र व्हायची वाट पाहणार होतो. त्याआधी लाखो (हंगेरीअन) रुपये उधळून स्मरणिका विकत घेतल्या. हंगेरीचे चलन निराळे असले तरी छोट्या-मोठ्या खारादेसाठी दुकानदार युरो घेतात. पण उरलेले पैसे युरोमध्ये देतीलच याची खात्री नाही.

परत निघण्यापूर्वी रात्रीचे बुडापेस्ट डोळे भरून बघितले. युरोपात कोठेही जा, सगळी ठिकाणं दिवसा आणि रात्री परत बघायलाच पाहिजेत.

रात्री, एलिझाबेथ पूल, पार्श्वभूमीला सितादेला,


तर असे पहिले दोन दिवस गेले. परत निघायला शनिवारच्या विमानाची तिकिटे काढली होती. म्हणजे आमच्या हातात पाच दिवस होते. ठरल्या प्रमाणे दोन दिवस व्हिएन्ना, दोन दिवस साल्झबर्ग आणि एक दिवस इन्सब्रुक करणार होतो. हॉटेल आधीच बुक केली होती. आता सोमवारी पहिल्यांदा रेल्वे स्टेशनावर जाऊन व्हिएन्ना-साल्झबर्ग-इन्सब्रुक-व्हिएन्ना अशी तिकिटे काढली.

युरोपातील प्रत्येक शहर दुसऱ्यापेक्षा वेगळे भासते. (युरोपातलंच का? तसं तर कुठलंही शहर दुसर्‍या कुठल्याही शहरापेक्षा वेगळ असतंच!) पॅरिस कसं इतकं निटनेटकं आहे की फिरताना सगळ्या गल्ल्या एकसारख्याच वाटतात. एक लेनचा रस्ता, बाजुला (असल्यास) पार्किंग आणि दोन्हिकडे दगडाच्या चार-पाच मजली इमारती, मधे छोटासा पादचारी मार्ग. सगळं आहे रेखिव पण त्यात एक तोचतोचपणा येतो. बार्सिलोना अगदी वेगळं, कुठल्याही दोन शेजारशेजारच्या इमारती एकसारख्या नसल्या पाहिजेत असा नियम आहे बहुतेक! प्रत्येक इमारतीला बाल्कनी असतेच आणि त्यांची रचनाही निरनिराळी असते. या कशातही सुत्रबद्धता नसली तरी बार्सिलोना आवडलं. व्हिएन्नापण या दोन्हीपेक्षा वेगळं. गावाच्या मध्यभागी स्टिफन्सडोम नावाचं चर्च आहे त्याच्या अजुबाजुला रस्ते अगदीच लहान आहेत. पण तेवढे सोडले तर बाकी ठिकाणी रस्ते प्रशस्त आहेत. अगदी दोन्हीकडे पार्किंग मग प्रशस्त पादचारीमार्ग आणि त्यापलिकडे जुन्या गिलावा केलेल्या इमारती. व्हिएन्नामधे मेट्रो आहेच शिवाय ट्रामही बर्‍याच आहेत. त्या ट्रामच्या तारा डोक्यावरुन जातात. त्या तारांसाठी खांब न बांधता अजुबाजुच्या इमारतींवरुन तारांनी ओढुन धरल्या आहेत तिच गोष्ट रत्यावरच्या दिव्यांची, त्यामुळे रस्त्यावरुन जाताना डोक्यावर तारांचं जाळ दिसतं. मला नेहमी वाटयचं की या तारांवर एक ताडपत्री पसरुन दिली की पुर्ण रस्ताभर मस्त शेड होईल.



कुणीतरी केलेल्या पाहाणीत व्हिएन्नात म्हणे वृद्ध/अपंग व्यक्तिंसाठी सर्वाधीक सोई आहेत. हे मात्र लगेच लक्षात येतं. प्रत्येक भूमिगत मेट्रो स्थानकात लिफ्ट आहे. नवीन ट्राम पायरी नसलेल्या आहेत (वर चढायची गरज नाही), शिवाय पुढची अपंगांसाठी सोईची ट्राम किती मिनीटात आहे हे देखिल थांब्यांवर दाखवलं जातं. तुलना पॅरिसशी करायची तर, मेट्रोमधे लिफ्ट सोडा सगळीकडे सरकते जिने देखिल नाहीत. धडधाकट माणुस देखिल बरोबर सामान घेउन जाताना असला वैतागतो :राग: . अन मेट्रो बदलायची असेल तर इतकं चालावं लागतं... त्यामुळे पॅरिसमधे वृद्ध/अपंगांना बसशिवाय पर्याय नाही.

यावेळी पहिल्यांदाच वाया-मिशेलिनचे पर्यटक मार्गदर्शक (travel guide) वापरले. मस्त उपयोग झाला त्याचा. व्हियेन्नामधे भाऊच असल्याने इथेतरी आम्ही टूर घेणार नव्हतोच. कुठुन कसे जायचे आणि काय काय बघायचे ते दादानी सांगितले, बाकी सगळी माहिती त्या पुस्तकात व्यवस्थित मिळाली. शिवाय एक पायी फिरण्याचा रस्ताही त्यात असतो, तो केल्याने जुन्या व्हिएन्नातील जवळपास सगळी ठिकाणे कमी वेळात बघता आली.

व्हिएन्नामधे आम्ही खालील ठिकाणं पाहीली, यातली काही पर्यटकांमधे प्रसिद्ध आहेत तर काही माझ्या भावामुळे आम्हाला बघायला मिळाली.

- श्योनबृन महाल: पॅरिसजवळील व्हर्सायच्या (व्हर्सायचा तह फेम) महालाची आठवण करुन देणरा. समोर आडवा पसरलेला महाल, मागे लांबवर बाग, बागेत बरेच पुतळे, फस्त बागेच्या त्या टोकाला तळ्याऐवजी एक टेकडी.



त्या टेकडीवरुन आख्ख व्हियेन्ना बघता येतं,



- स्टिफन्सडोम (सेंट स्टिफन्स चर्च): व्हियेन्नाचे सगळ्यात महत्वाचे चर्च. अजुबाजूला चिक्कार पर्यटक (आमच्यासारखे). चर्चच्या एका भागाचे अजुनही नूतनीकरण चालू आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या अशा जखमा अजुनही बर्‍याच ठिकाणी बघायला मिळतात.



चर्चच्या आत पहिल्यांदाच मला ऑर्गन पाइप ठळकपणे दिसले. हे पियानो आणि बासरी यांचे हायब्रीड वाद्य यानंतर ऑस्टियात इतर चर्चमधेही दिसुन आले.



- ऑस्ट्रियाची संसद: ही बाहेरुन पॅन्थिऑन सारखी दिसणारी भव्य इमारत आतुनही पाहाण्याचा योग आला. दुसर्‍या महायुद्धात याचेही बरेच नुकसान झाले होते. ऑस्ट्रियाची लोकशाही बरिचशी आपल्यासारखी (संसदीय) असली तरी बराच फरक आहे.



आत आम्ही तीन वेगवेगळी मोठ्ठी दालने बघितली. एक बरेच जुने होते. त्याचे काचेचे छत अतिशय सुरेख होते. सुदैवाने महायुद्धात त्या छताला काही झाले नाही.



- बेलवेडेर महाल: ह्या महालाच्या पुढे-मागे प्रशस्त बाग आहे. महालात एक संग्रहालय आहे पण आम्ही ते पाहिले नाही. (अजुन पॅरिसमधेली बरीचं संग्रहालयं राहिली आहेत!)

- वायनर रेसनराड: डेन्युबच्या किनार्‍याला, व्हियेन्नाच्या थोडे बाहेर एक मनोरंजन उद्यान (amusement park) आहे. तिथला १०० वर्ष जुना पाळणा प्रसिद्ध आहे. जवळपास तो 'लंडन आय' चा पूर्वज वाटतो.

- गॅसोमिटर: ह्या इमारती बाहेरुन बघायला काहितरी विचित्र वाटतात. फार पुर्वी शहरात इंधन म्हणुन नैसर्गिक वायू वापरला जात असे. त्याच्या ह्या टाक्या होत्या. तंत्रज्ञानातील बदल आणि इतर कारणांसाठी या टाक्यांचा वापर थांबवण्यात आला आणि आता त्यांचे बाहेरील स्वरूप तसेच ठेउन आतमधे मोठ्ठे शॉपिंग सेंटर उभारले आहे.



- स्टाड बाग: येथील जॉह्न स्ट्रॉसचा पुतळा हा फोटो काढायचे पेटंट ठिकाण आहे.



हा स्ट्रॉस काळा की गोरा मला अजुनही माहिती नाही. हातात व्हायोलिन आहे म्हणजे संगितकार असावा. ऑस्टिया देश हा संगितासाठीही प्रसिद्ध आहे. बिथोवन, मोझार्ट झालचतर हा स्ट्रोस यांची ही कर्मभूमी. मला त्यातलं ओ की ठो कळत नाही... त्यामुळे मी काय जास्त त्यांच्या वाट्याला गेलो नाही.

- वॉहरिंग सिमेट्री: इथे बिथोवनचे थडगे आहे. तसेच मोझार्टचे स्मारक ही आहे. पहिल्यांदाच असे स्मशानातुन (दुसरं काय म्हणु?) फिरत होतो. वेगवेगळ्या प्रकारची अनेक कलाकुसर केलेली थडगी बघितली.

अशा प्रकारे आमची आर्धा प्रवास संपला... आणि हा भागही... आता पुढच्या भागात साल्झ्बर्ग आणि इंसब्रुक बद्दल. अजुन फोटो बघायची इच्छा (किंवा धमक) असेल तर पिकासावर बघता येतील, पण साल्झ्बर्ग आणि इंसब्रुक चे फोटो कृपया बघू नका!

आंतर्जालावरील माहिती-
व्हिएन्ना पर्यटन
ऑस्ट्रियन रेल्वे: OBB
व्हिएन्नामधील टूरस्

टिप [१] बाकिच्या स्वस्त विमानसेवा चेक-इन केलेल्या प्रत्येक डागामागे १० युरो घेतात! मग आम्ही सगळं सामान केबिन मधुनच नेतो... थोडक्यात काय मोजकचं सामान नेतो... आणि परत आणतो!

टिप [२] पॅरिसमधे परत आल्यावर माझ्या फ्रेंच सहकार्‍यांना वखाउ ही जगप्रसिद्ध वाइन आणली म्हणुन सांगितलं तर त्यांना हे नाव माहितच नाही! सगळे पक्के फ्रेंच, फ्रान्सच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक गल्लीतली वाइन यांना माहिती पण शेजारच्या देशातली 'जगप्रसिद्ध' वाइन नाही माहीत!